कर्मचारी तक्रारप्रकरणी शिवसेनाही आयुक्तांच्या पाठीशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या म्युनिसिपल अधिकारी संघटनेची ताकद दिवसागणिक क्षीण होत आहे. भाजपपाठोपाठ विरोधी पक्ष शिवसेनेनेही आयुक्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले. महापालिकेतील अन्य संघटनादेखील त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

नाशिक - महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या म्युनिसिपल अधिकारी संघटनेची ताकद दिवसागणिक क्षीण होत आहे. भाजपपाठोपाठ विरोधी पक्ष शिवसेनेनेही आयुक्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले. महापालिकेतील अन्य संघटनादेखील त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री व नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आयुक्तांची तक्रार केली. या पार्श्‍वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी यापूर्वीच आयुक्तांची पाठराखण करीत चांगले काम करीत असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीसुद्धा आयुक्तांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असताना महापालिका तांत्रिक अधिकारी संघटनेनेदेखील आयुक्तांविरोधात झालेल्या तक्रारीचा व संघटनेचा संबंध नसल्याचे ‘सकाळ’कडे सांगितल्याने तक्रारदार ऑफिसर्स असोसिएशनची ताकद दिवसागणिक क्षीण होत आहे.

चौकशीचे शिवसेनेकडून स्वागत
आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी महापालिकेच्या फायद्याचे निर्णय घेतले आहेत. कामचुकार व गैरव्यवहार करणाऱ्या आजी-माजी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याने त्यांचे स्वागत असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. खत प्रकल्प घोटाळा, पावसाळी गटार योजना, एलईडी खरेदी गैरव्यवहार याविरोधात यापूर्वीच शिवसेनेने अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती; परंतु अद्यापपर्यंत चौकशीचे आदेश धूळखात पडले. आयुक्तांनी चौकशीचे दाखविलेले धाडस स्वागतार्ह आहे. महत्त्वाकांक्षी योजनांचा बोऱ्या वाजविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे व दोषींना शासन झालेच पाहिजे. पालिकेशी प्रतारणा करणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नये, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. मर्यादित कालावधीत चौकशी पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी केली.

आयुक्त कृष्णा चांगले काम करीत आहेत. त्यांच्यावर संघटनेमार्फत दबाव आणला जात असेल तर शिवसेना आयुक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

Web Title: nashik news shiv sena municipal commissioner