करवाढीविरोधात शिवसेनेने थोपटले दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक - भाजपने घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानाची खिल्ली उडवत अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिला आहे. 

स्थायी समितीने आज घरपट्टीत १८ टक्के, तर पाणीपट्टीत १२० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा आज निर्णय घेतला. त्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. नाशिककरांनी भाजपला एकतर्फी सत्ता दिली. त्याचे फळ नाशिककरांवर करवाढ लादून सत्तारूढ भाजपने दिली आहे. करवाढीचा मोठा प्रस्ताव आणण्यापूर्वी प्रशासनाने सर्वपक्षीय गटनेत्यांना विश्‍वासात घेणे गरजेचे होते. भाजपने प्रामाणिकपणे कर अदा करणाऱ्या करदात्यांवर अन्यायकारक करवाढ लादून विश्‍वासघात केला आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीप्रणाली लागू करून आधीच नागरिकांना मेटाकुटीला आणले असताना स्थानिक पातळीवर करवाढीचा निर्णय घेऊन नाशिककरांवर अन्याय केला आहे. थकबाकी वसुलीत भाजप अयशस्वी ठरली आहे. मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत ५२ हजार मिळकतींवर कर नसल्याचे आढळून आले आहे. या मिळकतींना दंडाच्या रकमेसह घरपट्टी लागू करणे आवश्‍यक असताना प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर करवाढ लादली आहे. महापालिकेने प्रथम पाणीगळती बंद करून नाशिककरांना दोन वेळेस पाणीपुरवठा करावा. त्यानंतरच करवाढीचा विचार करावा, अशी मागणी श्री. बोरस्ते यांनी केली.

Web Title: nashik news shiv sena tax