‘शिवशाही’साठी नाशिककरांना करावी लागेल प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नाशिक - राज्य परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा केलेल्या स्लीपर कोच शिवशाही बससाठी नाशिककरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून शिवशाही बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागाला एकही शिवशाही बस मिळालेली नाही.  

नाशिक - राज्य परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा केलेल्या स्लीपर कोच शिवशाही बससाठी नाशिककरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून शिवशाही बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागाला एकही शिवशाही बस मिळालेली नाही.  

‘एसटी प्रवास- सुखाचा प्रवास’ असे ब्रीदवाक्‍य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवाशांना दर्जेदार व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच खासगी लक्‍झरी बसगाड्यांच्या आव्हानाला टक्कर देता यावी, तसेच प्रवाशांना रात्री वातानुकूलित गाडीत झोपून प्रवास करता यावा म्हणून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागातर्फे शिवशाही बसगाडी सुरू करण्याची घोषणा केली होती. शिवशाही नाव असलेल्या ११०० बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात येणार असल्याचेही त्या वेळी सांगण्यात आले होते. या घोषणेनुसार राज्यातील ‘एसटी’च्या प्रत्येक विभागाला शिवशाही बसगाडी मिळणार असल्याने प्रत्येक विभागाकडून तसे प्रस्तावदेखील दाखल करण्यात आले. 

पहिल्या टप्प्यात राज्यातील पुणे, मुंबई या मोठ्या विभागीय कार्यालयांत शिवशाही बसगाडी दाखल झाली असून, येथून पुणे- लातूर, मुंबई- रत्नागिरी, परभणी, बीड, मराठवाडा, नागपूर अशा विविध मार्गांवर सेवा सुरू झाली आहे. नाशिक विभागानेही मोठा गाजावाजा करत शिवशाही दाखल होणार असून, येथून विविध आठ मार्गांवरून शिवशाही गाडी सुरू करण्याची घोषणा ‘एसटी’च्या विभाग नियंत्रकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. शिवशाहीसाठी प्रस्तावदेखील पाठविण्यात येऊन त्यात काही अडचण नसल्याचेही कळविण्यात आले. मात्र, एवढे होऊनही नाशिक विभागाला पहिल्या टप्प्यात एकही शिवशाही बसगाडी मिळालेली नाही. नाशिककरांना आता शिवशाही बसगाडीचे दर्शन होण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागेल, याचे उत्तर अनुत्तरितच आहे.

नाशिक-पुणे मार्गाचा अजून अभ्यासच
सध्या नाशिक-पुणे महामार्गावर परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवनेरी बसगाडी दररोज धावत आहे. याचे प्रवासभाडे सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्‍याबाहेर आहे. जर शिवशाही बसगाडी नाशिक-पुणे आणि इतर मार्गांवर सुरू केली तर तिला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळेल, प्रवासभाडे कितपत परवडण्यासारखे असेल, याचा विचार केला जात आहे. त्यामुळे शिवशाही बसगाडी दाखल झाली तरीही तिला मिळणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिसादावरच सर्वकाही अवलंबून असेल.

Web Title: nashik news shivshahi msrtc