सोनई हत्याकांडातील सहा आरोपी दोषी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सोनई हत्याकांड प्रकरणात सातपैकी सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या सहा आरोपींच्या शिक्षेबाबत येत्या 18 तारखेला न्यायालय अंतिम निकाल देईल. या प्रकरणी 53 साक्षीदार तपासण्यात आले असून, प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाला सादर करण्यात आले. त्याआधारे न्यायालयाने निकाल दिला.
- ऍड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

नाशिक - सोनई (जि. नगर) तिहेरी हत्याकांडप्रकरणी सोमवारी (ता. 15) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सातपैकी सहा जणांना दोषी ठरविले. या सर्वांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. सबळ पुराव्यांअभावी एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. येत्या गुरुवारी (ता. 18) आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान, दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने भर न्यायदानाच्या कक्षात आपण निर्दोष असल्याचे सांगत गोंधळ घालत न्यायाधीशांसह पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली. ऑनर किलिंगच्या प्रकरणातील मृतांच्या नातलगांनी अश्रूंना मोकळी वाट करून देत दोषींना फाशीच झाली पाहिजे, तेव्हाच आम्हाला खरा न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

नेवासे सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. तेव्हापासून न्या. आर. आर. वैष्णव यांच्यासमोर खटला सुरू होता. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 53 साक्षीदार तपासले होते. प्रत्यक्ष एकही साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष या आधारे न्या. वैष्णव यांनी सातपैकी सहा आरोपींना मनुष्यवध व खुनाचा कट या गुन्ह्यात दोषी ठरविले. न्या. वैष्णव यांनी सहा जणांना दोषी ठरविल्याचे जाहीर करताच दोषी ठरविण्यात आलेल्यांपैकी अशोक नवगिरे याने न्यायदान कक्षातच गोंधळ घालत आर्वाच्य भाषा वापरली.

दोषी ठरविण्यात आलेले आरोपी - प्रकाश विश्‍वनाथ दरंदले (वय 38), रमेश विश्‍वनाथ दरंदले (39), पोपट विश्‍वनाथ दरंदले (48), गणेश पोपट दरंदले (19, सर्व रा. गणेशवाडी, ता. नेवासे), अशोक सुधाकर नवगिरे (28), संदीप माधव कुऱ्हे (वय 33) यांच्या शिक्षेबाबत येत्या गुरुवारी (ता. 18) अंतिम निकाल दिला जाईल. आरोपींतर्फे ऍड. अविनाश भिडे, राहुल कासलीवाल यांनी कामकाज पाहिले. या हत्याकांडाबाबत निकाल असल्याने न्यायालयाच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

फाशी की जन्मठेप?
दोषी ठरविण्यात आलेल्या सहा आरोपींना गुरुवारी (ता. 18) शिक्षा सुनावली जाणार आहे. अत्यंत क्रूरपणे तिहेरी हत्याकांड करण्यात आले होते. त्यामुळे दोषींना फाशी सुनावली जाते की जन्मठेप याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

फलके सुटला निर्दोष
हत्याकांडातील अशोक रोहिदास फलके (वय 40, रा. लांडेवाडी, ता. नेवासे) याची न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. फलकेची 25 हजारांच्या जातमुचलक्‍यावर मुक्तता करण्यात आली.

हत्याकांडात वापरण्यात आलेला लाकडी दांडा, जो पंचनाम्यात बिनासालीचा, तर प्रत्यक्ष न्यायालयात सालीचा दांडा आणला, तसेच तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला नाही. त्यावर रक्ताचे नमुने मिळाले नाहीत. मोबाईल ट्रॅकिंगमध्येही फलकेविरोधात सबळ पुरावा मिळू न शकल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याच्या बाजूने ऍड. राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली होती.

अशी होती घटना...
नेवासे फाटा येथील घाडगे पाटील महाविद्यालयातील एका मुलीच्या मेहतर समाजाच्या मुलावरील प्रेमप्रकरणातून 1 जानेवारी 2013 ला सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज थनवार (वय 24), राहुल कंडारे (26), सचिन घारू (वय 23) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये सचिन, संदीप व राहुल कामाला होते. मेहतर समाजाच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वस्तीवरील स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची असल्याचा बहाणा करून सचिन घारूसह संदीप धनवार व राहुल कंडारे यांना बोलावले. या वेळी आरोपी प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, पोपट विश्‍वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांनी सचिन घारू याला सेफ्टी टाकीमध्ये बुडवून मारले, तर संदीप धनवार, राहुल कंडारे यांना कोयत्याने ठार केले. त्यानंतर तिघांच्याही मृतदेहांचे वैरण कापण्याच्या अडकित्त्याने तुकडे करून ते विहिरीतील बोअरमध्ये टाकून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक करत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सुरवातीला राजकीय दबावातून हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे मृत संदीप धनवार याच्या लष्करातील भावाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत खटला नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालविण्याची विनंती केली. त्यानुसार खंडपीठाने याचिकाकर्त्याचे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून विनंती मान्य केली आणि खटला नेवासे सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.

घटनाक्रम
जानेवारी 2013

- ता. 1 - सचिन घारू, संदीप थनवार, राहुल कंडारे यांचे हत्याकांड
- 9 - तिहेरी हत्यांकाडाचा "सीआयडी'मार्फत तपास करण्यासाठी मेहतर वाल्मीकी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता
- 12 - दलित व आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- 31 - रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी घटनास्थळी दिली भेट. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आणि खटला जिल्ह्याबाहेर चालविण्याची केली मागणी
फेब्रुवारी 2013
- ता. 2 - विधी व न्याय खात्याचे सदस्य सी. एस. थुल, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आर. के. मेढे यांनी भेट दिली. खटला जिल्ह्याबाहेरील न्यायालयात चालेल, असे सांगितले
- 4 - तत्कालीन रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी घटनास्थळी दिली भेट
- 6 - तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोनई तिहेरी हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी)कडे सोपविल्याची घोषणा केली
- 6 - पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सोनई येथे जाऊन हत्या झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या हत्याकांडाची
निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली
- 8 - तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली हत्या झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची भेट. गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याचे दिले होते आश्‍वासन
- 9 - तत्कालीन पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी)कडे देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मागणी करणार असल्याचे सांगितले होते
- 9 - तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांची घटनास्थळी भेट
- 24 मार्च 2013 - मृत संदीप थनवार याच्या पत्नीला समाजकल्याण विभागात सरकारी नोकरी
- 16 एप्रिल 2013 - तिहेरी हत्याकांडाची सुनावणी नाशिक किंवा जळगावला करण्याबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाची सरकारला शिफारस
- 31 ऑगस्ट 2013 - विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- 15 जानेवारी 2018 - सहा आरोपी दोषी; एकाची निर्दोष मुक्तता

Web Title: nashik news six accused convicted in sonai tripple murder case