झोपडपट्टीतील मुलांवर "निराधार'चे छत्र 

अरुण मलाणी
सोमवार, 8 जानेवारी 2018

नाशिक - शिक्षणाचा हक्‍क कायदा 2009 मध्ये आला असला, तरी आजही आर्थिक दुर्बल घटकांतील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. अशांसाठी चोवीस वर्षांपासून निराधार स्वावलंबन समिती संस्थेतर्फे अंबडमधील (नाशिक) रमाबाई आंबेडकरनगर परिसरात शाळा चालविली जाते. परिसरातील झोपडपट्टीतील सोळा विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या शाळेत आज 578 विद्यार्थी शिक्षण घेताहेत. विनाअनुदानित तत्त्वावरील या शाळेचा कारभार 1993 पासून आजही देणगीदारांच्या मदतीवर चालतो. शाळेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींची संख्या अधिक असणे. 

परिसरात दोन-तीन मैलांपर्यंत शाळा नाही. शिक्षणापासून दुरावलेल्या झोपडपट्टीतील मुलांसाठी विस्तार अधिकारी असलेल्या के. आर. बुरकुले, एस. डी. कर्पे यांच्यासह मुख्याध्यापकांनी 1993 मध्ये निराधार स्वावलंबन समितीच्या माध्यमातून पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू केली. गौतमनगर, शांतीनगर वस्तीतील विद्यार्थ्यांना शाळेचा फायदा होऊ लागला. शिक्षणासाठी मुलींना लांब पाठविण्यास तयार नसलेल्या पालकांना शाळेमुळे भक्कम पर्याय मिळाला. शिक्षणापासून वंचित मुलांमधील व्यसनाधीनता घटली; मुलींचा कमी वयात लग्न होण्याचा धोका टळला. शिक्षणातून जीवनाची पहाट ते अनुभवू लागले. 

संस्थेशी जोडले जाताना सनदी लेखापाल सी. जे. गुजराथी यांनी स्वत: शाळेकरिता देणग्या दिल्या. त्याचवेळी आपल्या व्यवसायाद्वारे अन्य देणगीदारांकडूनही शाळेसाठी मदत मिळवून दिली. धर्मादाय आयुक्‍तांकडे केलेल्या नोंदणीमुळे दानशूरांना करसवलतीचा लाभही या माध्यमातून करून दिला. 

परवानगी मिळाली पण... 
1993 ते 2002 पर्यंत शाळा सुरू करण्याच्या परवानगीकरिता अर्ज करूनही परवानगी मिळाली नाही. 2002 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लोकशाही दिनास केलेल्या अर्जावर कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी मिळाली. असे असूनही संस्थेने व्यवस्थितरीत्या कामकाज करत आठवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली आहे. फक्‍त पंधरा रुपये प्रतिविद्यार्थी शुल्क, तेही संकलित रकमेतून खर्च करत शाळेचे कामकाज सुरू आहे. मानधन तत्त्वावरील चौदा शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. त्यासाठीची रक्‍कमही देणगीतून उभारली जाते. कुणी गणवेशाचा खर्च उचलतो, तर कुणी विद्यार्थ्यांना स्वेटर, पुस्तके देतो, अशी शाळेची आतापर्यंतची वाटचाल आहे. 

खऱ्या अर्थाने निराधार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आनंद वेगळा आहे. शाळेच्या मालकीची जागा नसल्याने अडचणी येतात. दानशूर व्यक्‍तीने जागा दिल्यास किंवा शाळा बांधून दिल्यास हे कार्य अधिक वेगाने पुढे जाईल. कधीही शिक्षण न घेऊ शकणाऱ्यांना या शाळेने शिक्षणाची वाट दाखविली आहे. 
- सी. जे. गुजराथी,उपाध्यक्ष, निराधार स्वावलंबन समिती 

शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती, विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. विद्यार्थिनींना तर शाळेचा मोठा आधार आहे. कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची आमची तयारी आहे. 
- उषा कर्पे, मुख्याध्यापिका

Web Title: nashik news slum children education