लहान मॉल्स, होम डिलिव्हरीत अमर्याद रोजगार

लहान मॉल्स, होम डिलिव्हरीत अमर्याद रोजगार

रिटेलमध्ये संधी - मिसळ, चिवडा, तांदूळ, किराणा साखळी रुजली

नाशिक - चिवडा, भेळ, मिसळ, दूध, मिठाई, द्राक्षे, डाळिंब व कांदा ही नाशिकची शतकाची परंपरा व ओळख आहे. यातील सर्व वस्तू सध्या सातासमुद्रापार पोचल्या आहेत. त्याचा प्रवास म्हणजेच रिटेल क्षेत्रातील संधी आहेत. विस्तारलेले शहर, नवी पिढी, नवा ग्राहक मूड व्यापारातील नवा ट्रेंड खुणावतोय. त्यामुळे शहरात विविध क्षेत्रांद्वारे रिटेलमध्ये तीन हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी आहेत. 

वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी देशात रिटेल हे एक क्षेत्र आहे. सध्या त्याची सुरवात होऊ घातली आहे. थेट परकीय गुंतवणुकीचे धोरण आले आहे. व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न होताहेत. अनेक ब्रॅन्ड येत आहेत. भारतीय ब्रॅन्डसुद्धा त्यांचा व्यवसाय विस्तार करीत आहेत. स्टोअर, तसेच वितरण जाळ्याचा विस्तार करताहेत. याचे उत्तम व्यावसायिक उदाहरण म्हणजे ‘पतंजली’ होय. मात्र, पतंजलीशी स्पर्धा करतील अशी शंभराहून अधिक उत्पादने, आयुवेर्दिक वस्तू खादी- ग्रामोद्योग संस्थेकडे आहेत. नाशिकमध्ये त्याचे नियमित व मोफत प्रशिक्षण दिले जाते. तत्सम विविध व्यवसाय सध्या उपलब्ध आहेत. नव्या कल्पना प्रत्यक्षात आणता येतील. 

काळ बदलतो आहे. त्यानुसार बदलण्याची सर्वाधिक संधी आज शहरात अस्तित्वात असलेल्या रिटेल व्यावसायिकांना आहे. रिटेल अर्थात, विविध ब्रॅन्डचा प्रसार, किराणा व घरगुती वस्तू, खाद्यपेय विक्रेते, होम डिलिव्हरी, तयार कपडे, फॅशनच्या वस्तू, औषधे व तयार जेवण आदींमध्ये आहे. सध्या हे सर्व व्यवसाय शहरात सुरू आहेत. त्याला आधुनिकतेचा स्पर्श, कल्पकता व बदल आणि माहिती तंत्रज्ञानाची जोड आवश्‍यक आहे. ४० वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय हॉटेल म्हणजे खानावळ. आज तीच खानावळ कात टाकते आहे. त्याचे रूपांतर रेस्टॉरंटमध्ये करावे लागेल. अन्यथा ते बंद होईल. रोजगाराची संधी घेतली तरच भविष्य आहे, असा या क्षेत्रातील व्यावसायिकांचा अनुभव आहे. हल्ली सिंगापूर, श्रीलंका, मलेशिया, थायलंड या तुलनेने खूपच लहान देशांत युवकांच्या पुढाकाराने २४ X ७ अर्थात, आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास सुरू राहणारी साखळी दुकाने आहेत. ऑनलाइन खरेदी-विक्री, ॲपद्वारे रिटेल सेवेचा विस्तार, बदलीवर येणारे अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, गरजूंना घरपोच जेवणाचे डबे, निवडलेल्या घरगुती, भुसार वस्तू घरपोच सेवा अगदी पिझ्झा डिलिव्हरीसारखे. त्याला प्रत्येक वळणावर वाव आहे. त्यातून रोजगार उपलब्ध होत आहे. 

नाशिक आणि रिटेल
नाशिक शहरात चिवडा, भेळ, दूध, मिठाई, द्राक्ष, डाळिंब व कांदा यांना शतकाचा इतिहास आहे. त्यातील घराणीही प्रसिद्ध आहेत. कोंडाजी वावरे हे पाटीभर चिवडा तयार करून गंगेवर विकत. सानप यांची भेळ गरिबांना पोटाचा आधार होता. पांडे यांची मिठाई नावारूपाला आली होती. यातील चिवड्याचे ब्रॅन्डिंग होऊन निर्यात होते. द्राक्ष, कांदा, डाळिंब जगभर पोचला. या प्रत्येकाची संकेतस्थळे आहेत. सध्या पेटंटचे प्रयत्न होताहेत. हा प्रवास म्हणजेच रिटेलमधील रोजगार होय. 
 

रिटेल क्षेत्रात प्रवेश
रिटेल क्षेत्र विविध प्रकारच्या करिअरच्या संधी देते. व्यापार, व्यवस्थापन, ई-कॉमर्स, अकाउंट, कायदेशीर बाबी, पुरवठा व वाहतूक आणि व्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतात. सर्वांत सोपा मार्ग म्हणजे रिटेल स्टोअरमध्ये समर इंटर्नशिप (उन्हाळ्यातील रोजगार). यासाठी अर्ज करणे व हे काम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची चाचपणी करणे. पण रिटेल क्षेत्रात करिअरबाबत तुम्ही गंभीर असाल तर उत्तम मार्ग म्हणजे, रिटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेणे. देशातील रिटेल क्षेत्राची सर्वोच्च संघटना असलेल्या रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून रिटेल व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि रिटेल क्षेत्रातील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमांना पाठबळ दिले जाते.
 

‘रिटेल’ रोजगार क्षेत्र
चिवडा, भेळचे ब्रॅन्डिंग
नव्या स्वरूपातील वडापाव
द्राक्ष, डाळिंब, फळे पॅकेजिंग
मील ऑन व्हील
होम डिलिव्हरी इन टाइम
घरपोच औषधांची साखळी

धोरणात्मक बदल
लहान मॉल्सच्या सवलती
२४ तास कार्यरत दुकाने
जैविक उत्पादने विक्री
शेतमाल वाहतूक साखळी
नोंदणीचे नियम बदलणे
पतपुरवठा धोरण सुधारणा
 

प्रशिक्षण संस्था
मुक्त विद्यापीठ
मविप्र जनशिक्षण संस्थान
त्र्यंबक विद्यामंदिर (खादी)
नाशिक इंजिनिअरिंग क्‍लस्टर 
मिटकॉन

स्थलांतरितांच्या संख्येमुळे विविध व्यवसायाच्या संधी

शहरात गंगापूर रोड, कॉलेज रोड, सावरकरनगर, अशोक स्तंभ, म्हसरूळ, जुने नाशिक भागात पोळी-भाजी, डाळ-भात, बिर्यानी, शाकाहारी - मांसाहारी अगदी हवे ते पदार्थ तयार मिळतात. शहर वाढले तसे त्यात स्थलांतरित वाढणार असल्याने तत्सम रिटेल, व्यवसायांना संधी आहे. त्यात महिला, युवक व तरुण सर्वांना संधी आहे. त्यात लौकिक वाढेल तसे पैसे व उत्पन्न वाढते. शहरातील महाविद्यालयांना जोडलेल्या व खासगी होस्टेलचा व्यवसाय सध्या जोरात आहे. महामार्गावर फळांचे स्टॉल, शहरातील उपनगरांत लहान मॉल्स (दुकाने), औषधे व जनरल स्टोअर्स, होम डिलिव्हरी, अशा क्षेत्रात एका संस्थेत थेट व अप्रत्यक्ष चार ते पाच जणांना रोजगार शक्‍य आहे. त्या दिशेने अल्प कालावधीचे प्रशिक्षण देण्याच्या सुविधा विविध शैक्षणिक संस्था व व्होकेशनल संस्थांतून मिळते. मिटकॉन, निमा, आयमा, नाशिक इंजिनिअरिंग क्‍लस्टर, खादी- ग्रामोद्योग या त्यातील प्रमुख संस्था आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com