सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणातील सहा आरोपींच्या शिक्षेवर आज फैसला 

सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणातील सहा आरोपींच्या शिक्षेवर आज फैसला 

नाशिक - बहुचर्चित सोनई (जि. नगर) येथील तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सहा आरोपींना गुरुवारी (ता. 18) शिक्षा सुनावली जाणार आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी गेल्या सोमवारी (ता. 15) सातपैकी सहा जणांना खून, खुनाचा कट रचणे याप्रकरणी दोषी ठरविले होते. राज्यभर गाजलेल्या तीन दलित युवकांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सहा आरोपींना फाशी की जन्मठेप सुनावली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये नेवासे सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हलविण्यात आल्यापासून न्या. वैष्णव यांच्यासमोर सुरू होता. समाजातील वरच्या जातीतील मुलीशी दलित समाजातील युवकाचे असलेल्या प्रेमप्रकरणातून एक जानेवारी 2013 ला सचिन सोहनलाल घारू (वय 23), संदीप राज थनवार (26), राहुल कंडारे (वय 26) यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सात आरोपींपैकी सहा जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. यात प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, पोपट विश्‍वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक सुधाकर नवगिरे व संदीप माधव कुऱ्हे यांचा समावेश आहे. गुरुवारी (ता. 18) त्यांना शिक्षा सुनावली जाईल. 

राज्यभर गाजलेल्या या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारपक्षातर्फे बाजू मांडली. यात 53 साक्षीदार तपासण्यात आले. एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे सादर करीत आरोपींना दोषी ठरविण्यात आले. ऍड. अविनाश भिडे, ऍड. राहुल कासलीवाल यांनी आरोपींतर्फे कामकाज पाहिले. संवेदनशील खटला असल्याने उद्या न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com