नाशिकला "स्पेशल बेबी युनिट' 

नरेश हाळणोर
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नाशिक - गेल्या वर्षी जिल्हा रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या कमतरतेमुळे नवजात बालके दगावल्याचा प्रकार उघडकीस आला. खडबडून जाग आलेल्या सरकारच्या आरोग्य विभागाने तातडीने जास्तीचे नऊ इन्क्‍युबेटर महिनाभरात उपलब्ध करून देत संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये नवजात व कमी वजनाच्या बालकांच्या उपचारासाठी "स्पेशल बेबी युनिट' उभारण्यात येतील, असे घोषित केले. हेच "स्पेशल बेबी युनिट' नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये साकारले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सूचित केले आहे. या संदर्भातील पाहणी करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाचा दौरा करणार आहे. 

जिल्हा रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या कमतरतेमुळे एकाच महिन्यात 55 नवजात बालके मृत्युमुखी पडल्याची घटना सप्टेंबरमध्ये घडली. याबाबतचे वृत्त "सकाळ'मधून प्रसिद्ध झाले आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यावेळेस आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट देत आढावा घेतला. जास्तीचे नऊ इन्क्‍युबेटर जिल्हा रुग्णालयास दिले. जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा हे तालुके आदिवासीबहुल व तिथे बालमृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने त्यासाठी श्रेणी द्वितीयच्या धर्तीवर शालिमार चौकातील संदर्भ सेवा रुग्णालयात "स्पेशल बेबी युनिट' सुरू करण्यात येईल, असेही आश्‍वासन दिले. 

जिल्हा रुग्णालयाचे आवार केंद्र 
मंत्रालयात डॉ. सावंत यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात "स्पेशल बेबी युनिट' हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्येच सुरू करण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यासाठी मुंबईच्या वाडिया रुग्णालयाच्या "स्पेशल बेबी युनिट'चे प्रमुख व न्युरोलॉजिस्ट यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती लवकरच जिल्हा रुग्णालयास भेट देणार आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांपासून तंत्रज्ञ व परिचारिकांची सेवा सरकारतर्फे उपलब्ध केली जाणार आहे. याच धर्तीवर दुसरे "स्पेशल बेबी युनिट' विदर्भातील अमरावती येथे सुरू केले जाणार आहे. 

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी "स्पेशल बेबी युनिट' सुरू करण्यास सकारात्मक पावले उचलली आहेत. इन्क्‍युबेटर उपलब्ध झाल्याने नवजात बालकांच्या मृत्यूचा प्रश्‍न सुटू शकणार नाही, त्यासाठी "स्पेशल बेबी युनिट' आवश्‍यकच होते. लवकरच हे केंद्र सुरू होईल आणि नवजात बालकांवर नाशिकमध्येच उपचार करणे शक्‍य होईल. 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक जिल्हा रुग्णालय 

Web Title: nashik news Special Baby Unit