कामगार संघटनांमध्ये एसटी संपावरून फूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

दिवाळीत संप हा पर्याय नाही. कृती समितीतील 12 संघटनांचा संपाला विरोध आहे, असे एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी म्हटले आहे. या संपाला कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, कास्ट्राईब कमचारी संघटना यांनीही विरोध केला आहे.

नाशिक - एसटी कामगारांना वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह इंटकने मंगळवार (ता. 17) पासून पुकारलेल्या संपाला कामगार सेनेसह कृती समितीतील बारा संघटनांनी विरोध केला आहे.

एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी गेल्या 29 सप्टेंबरलाच संपाची नोटीस दिली आहे. एसटी कामगारांचे वेतन सर्वांत कमी आहे. त्यासाठी सरकारने वेतनाचा आर्थिक भार सहन करून वेतन आयोग द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी 16 ऑक्‍टोबरला मध्यरात्री बारानंतर कामगार संपावर जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

कामगार सेनेने मात्र या संपास विरोध करताना ऐन दिवाळीत प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही, असे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले पाहिजे यात कोणाचेही दुमत नाही; मात्र त्यासाठी दिवाळीत संप हा पर्याय नाही. कृती समितीतील 12 संघटनांचा संपाला विरोध आहे, असे एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी म्हटले आहे. या संपाला कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, कास्ट्राईब कमचारी संघटना यांनीही विरोध केला आहे.

Web Title: nashik news: st strike