राज्यातील पहिले वातानुकूलित बसपोर्ट कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नाशिक - राज्यातील ४१ बसस्थानके अत्याधुनिक करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असली, तरी तिला अद्याप गती मिळालेली नाही. त्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसपोर्टचे भूमिपूजन ३० जुलै २०१७ ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊन पाच महिने उलटे तरी बसपोर्टच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे साडेबारा कोटींचे काम विहित कालावधीत पूर्ण कसे होणार, असा प्रश्‍न नाशिककरांना भेडसावू लागला आहे.

नाशिक - राज्यातील ४१ बसस्थानके अत्याधुनिक करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असली, तरी तिला अद्याप गती मिळालेली नाही. त्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसपोर्टचे भूमिपूजन ३० जुलै २०१७ ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊन पाच महिने उलटे तरी बसपोर्टच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे साडेबारा कोटींचे काम विहित कालावधीत पूर्ण कसे होणार, असा प्रश्‍न नाशिककरांना भेडसावू लागला आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, हरिश्‍चंद्र चव्हाण आदींच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजन सोहळ्यामुळे सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुदतीच्या अगोदर नाशिकच्या वैभवात भर टाकेल, अशी भावना शहरवासीयांमध्ये तयार झाली. मात्र, सद्यःस्थितीत यंत्रांच्या सहाय्याने धुरळा उडवण्याच्या पलीकडे प्रत्यक्ष नव्या कामाला सुरवात झाल्याचे चित्र पाहावयास मिळत नाही. ही परिस्थिती अंतर्गत खदखदीमधून उद्‌भवली नाही ना?, अशा शंकेची पाल शहरवासीयांच्या मनात चुकचुकू लागली.

दरम्यान, सरकारने २०१५ मध्ये राज्यातील पाच बसस्थानके अद्ययावत करण्यासाठी १२५ कोटींची तरतूद केली होती. पण परिवहन विभागाने शंभर कोटींच्या बसगाड्या खरेदी केल्या. मेळा बसस्थानकासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी निधीची मागणी केली होती. सुरवातीला चार कोटी महामार्ग बसस्थानकाला आणि एक कोटी बसस्थानकाच्या आधुनिकीकरणास मंजूर करण्यात आले होते. वाढीव निधीसाठी प्रा. फरांदे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला.

बसपोर्टमधील सुविधा
५५ हजार चौरसफूट आकारमान
सीसीटीव्ही, साहित्य तपासणीसह सुरक्षाव्यवस्था
धार्मिक स्थळांची माहिती झळकणार चित्ररूपात
वीस फलाट अन्‌ तीनशे दुचाकींचे वाहनतळ
प्रवाशांप्रमाणे वाहक, चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतिगृह
दहा गाळे आणि थिएटर भाडेतत्त्वावर देणार
प्रवाशांना एलईडी फलकाद्वारे माहिती

मेळा बसपोर्टच्या जागेतील जुन्या इमारती पाडण्यात आल्या आहेत. त्याचे काम सुरू आहे. हे वातानुकूलित बसपोर्ट वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

परवानगीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यातील काही परवाने सोमवारी मार्गी लागले असतील. वृक्षविषयक परवानगीचा त्यात समावेश आहे. ही सारी प्रक्रिया पूर्ण होताच नव्या बसपोर्टच्या प्रत्यक्ष कामांना सुरवात होईल.
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक

Web Title: nashik news The state first air conditioned busport is on paper