डिजिटल शिक्षणापासून विद्यार्थी 'कोसो दूर'

कुणाल संत
गुरुवार, 6 जुलै 2017

नाशिक - आधुनिक युगाशी समरस होण्यासाठी अद्ययावत तंत्रशिक्षण, डिजिटल शिक्षण हवे; पण साहित्यांअभावी शासकीय आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोचलेले नाही. त्यापासून हे विद्यार्थी कोसो दूर आहेत. दुसरीकडे याबाबत शिक्षकांमध्येही आशादायक चित्र पाहायला मिळत नाही.

नाशिक - आधुनिक युगाशी समरस होण्यासाठी अद्ययावत तंत्रशिक्षण, डिजिटल शिक्षण हवे; पण साहित्यांअभावी शासकीय आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोचलेले नाही. त्यापासून हे विद्यार्थी कोसो दूर आहेत. दुसरीकडे याबाबत शिक्षकांमध्येही आशादायक चित्र पाहायला मिळत नाही.

समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या शासकीय आश्रमशाळांची सर्वस्तरावरील उदासिनतेमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आहे; पण शिक्षकच डिजिटल, तंत्रज्ञानाच्या शिक्षणापासून अनभिज्ञ आहेत. त्यांना डिजिटल शिक्षणाची प्रतीक्षा आहे. याचे प्रातिनिधिक उदाहरण देवरगाव येथील आश्रमशाळा म्हणता येईल. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वर्गाबरोबरच डिजिटल, तंत्रशिक्षणाच्या शैक्षणिक साहित्याअभावी परवड होताना दिसत आहे. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत डिजिटल शिक्षण हे केवळ नावापुरतेच उरले आहे.

शैक्षणिक साहित्यांचा वापर अभावानेच
विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत शिक्षण देण्यासाठी संगणक उपलब्ध नाहीत. शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके मिळणे अपेक्षित असते. मात्र, अद्यापही अनेक वर्गातील मुलांना या पुस्तकांची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दलची जिज्ञासा पूर्ण व्हावी, यासाठी प्रयोग करून दाखविण्यासाठी प्रयोगशाळेचे साहित्य आहे; पण या साहित्याचाही वापर होताना दिसत नाही. स्पिरीटचा दिवा आहे तर तो चालू करण्यासाठी स्पिरीटच नाही, अशी बिकट अवस्था या आश्रमशाळेची बनली आहे.

शिक्षकही सुविधांपासून वंचित
दुर्गम भागातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना शिक्षकांनी त्याचठिकाणी राहणे प्रशासनाकडून बंधनकारक केले आहे. शिक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते. शिक्षकांच्या वेतनातून त्यानिमित्त कपातदेखील केली जाते. देवरगाव येथील आश्रमशाळेत शाळा सुटल्यावर राहताना शिक्षकांना जीव मुठीत धरूनच राहावे लागते. आश्रमशाळेच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या खोल्या पावसाळ्यात गळतात. स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय बिकट आहे.

सौरऊर्जा संचही नावालाच
आश्रमशाळेत राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, हे लक्षात घेऊन प्रशासनाकडून विविध सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतात; पण या सुविधांबद्दल कुणी बोलायलाच नको. हिवाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने सात लाख रुपये खर्चून सौरऊर्जा संच बसवले आहे. मात्र, चार वर्षांत यामधून एकदाही विद्यार्थ्यांना एक बादलीही गरम पाणी मिळालेले नाही.

Web Title: nashik news student away to digital education