फीचे पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

अवघ्या दोन हजारांसाठी 
अतिशय हुशार असलेल्या विशालचा स्वभाव मनमिळाऊ होता. कमी बोलणारा व अभ्यासात हुशार असलेला विशाल शिक्षणासाठी मोठे स्वप्न बाळगून होता, असे त्याचे मित्र सांगतात. बसने जाण्यास पैसे नसल्यास तो कुणाच्याही गाडीला हात देऊन महाविद्यालयात जात असे. दुसऱ्या सत्राच्या उर्वरित शुल्कापैकी किमान दोन हजार रुपये जरी भरले असते, तरी त्याला परीक्षेला बसता येणार होते, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

चिचोंडी - महालखेडा (पा) (ता. येवला) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने उर्वरित वार्षिक शुल्क (फी) भरायला पैसे नसल्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. 

विशाल माणिक कुटे (वय 19) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो बुधवारी (ता. 21) सायंकाळी कटिंग करायला जातो, असे सांगून घरातून गेला होता. तो घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी गुरुवारी (ता. 22) पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर शनिवारी (ता. 24) गावातील नदीत असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. विशाल अत्यंत गरीब कुटुंबातील व एकुलता मुलगा होता. तो येवला येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. उर्वरित वार्षिक शुल्क भरण्याबाबत त्याला सुनावण्यात आले होते. त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे तो मित्रांना व आईला सांगायचा. महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याचे तो मित्रांकडे बोलला होता. गुरुवारपासून त्याचे पेपर सुरू होणार होते. घरची आर्थिक परिस्थिती दयनीय असल्याने व शुल्क भरण्यास पैसे नसल्याने त्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात आहे. गेल्या काही वर्षांत शेतीतून उत्पन्न निघत नसल्याने घरची परिस्थिती बेताचीच होती. वडिलांवर शेतीकर्ज व त्यातच कर्जमाफीचे बदलते नियम, यामुळे तो वैफल्यग्रस्त होता. गेल्या बुधवारी सायंकाळी तो वरच्या गावात कटिंग करायला जातो, असे सांगून गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी दुसऱ्या दिवशी येवला तालुका पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती. त्याचा नातेवाइकांकडेही शोध घेतला. शनिवारी(ता. 24) सकाळी नदीपात्रातील पडीक विहीर परिसरात साळुंक्‍या ओरडत असल्याने तेथे साप असावा, असे वाटून काही आदिवासी मुले तिकडे गेली, तेव्हा विहिरीत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह त्यांना दिसला. या मुलांनी पोलिसपाटील सजन पवार यांना याबाबत माहिती दिली असता, तो मृतदेह विशालचा असल्याचे समजले. त्याच्या मागे आई-वडील, लहान बहीण, असा परिवार आहे. तालुका पोलिस ठाण्याचे श्री. तांदळकर तपास करीत आहेत. दरम्यान, सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: nashik news student suicide crime tuition fee