'राष्ट्ररक्षणार्थ समर्थ सेवेकऱ्यांचे भगवतीला साकडे'

'राष्ट्ररक्षणार्थ समर्थ सेवेकऱ्यांचे भगवतीला साकडे'

नाशिक - देशाच्या सीमेवर आपले जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारतमातेचे रक्षण करीत आहेत. गुरुमाउलींच्या आशीर्वादाने आज आपण हजारो सेवेकऱ्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करून या जवानांच्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती उभी करून त्यांचे आत्मबल वाढविण्याचे काम केले आहे. जिवाची पर्वा न करता मायभूमीची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी ही अदृश्‍य ताकद उभी करण्यासाठी समर्थ सेवेकरी सातत्याने भगीरथ प्रयत्न करीत आहेत. गुरुमाउलींनी कायम समाज व राष्ट्रोद्धाराचा ध्यासच घेतला आहे, असे गौरवोद्‌गार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी  त्र्यंबकेश्‍वर येथे काढले.

संभाव्य महायुद्ध टाळावे, चीन-पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्रांना सद्‌बुद्धी सुचावी, या राष्ट्रांपासून भारतमातेचे रक्षण होऊन आपली सरशी व्हावी, विविध नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तींपासून राष्ट्राचे रक्षण व्हावे, या उदात्त हेतूने गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वादाने त्र्यंबकेश्‍वर येथील समर्थ गुरुपीठात बगलामुखी मंत्रासह सव्वा लाख दुर्गा सप्तशती पाठ घेण्यात आला. याप्रसंगी लाखाहून अधिक स्त्री-पुरुष सेवेकऱ्यांशी संवाद साधताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे बोलत होते. व्यासपीठावर गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, आमदार सीमा हिरे, त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षा तृप्ती धारणे, डॉ. प्रशांत पाटील व राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.

स्वच्छता अभियान
गुरुपीठात डॉ. सुभाष भामरे, चंद्रकांतदादा मोरे, आमदार सीमा हिरे, नगराध्यक्षा तृप्ती धारणेंसह हजारो सेवेकऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींचा ‘स्वच्छ भारत’चा संदेश घरोघरी सेवेकऱ्यांनी पोचवावा, असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. हा प्रारंभ असून, आपापल्या गावात सेवेकऱ्यांनी कायमस्वरूपी ही मोहीम राबवावी, असा आदेश अण्णासाहेबांनी दिला.

सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमास स्त्री-पुरुष सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. काल शनिवारपासूनच समर्थ गुरुपीठाच्या आवारात सेवेकऱ्यांनी गर्दी केली होती. सकाळी आठला दुर्गा सप्तशती पाठाला सुरवात करण्यात आली. मुख्य मंदिर, मंडप, अन्नदानाचे चारही मजले अशी जागा मिळेल तेथे बसून सेवेकऱ्यांनी आपली सेवा रुजू केली. सकाळी अकराला पाठ संपताच डॉ. भामरे व गुरुमाउलींनी सर्वांशी संवाद साधला.

स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सेवा - गुरुमाउली
भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून ही सेवा आपण हाती घेतली आहे. उत्तर-वायव्य सीमेवरील शत्रुराष्ट्रांची आपल्यावर कायमच वक्रदृष्टी असते. आज जगाचा विनाश करू शकतील, अशी शस्त्रास्त्रे सर्वत्र तैनात आहेत. तिसऱ्या महायुद्धाकडे कळत नकळत वाटचाल सुरू आहे. देशांतर्गत दहशतवाद, अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. दुष्काळ, प्रलय, साथीचे आजार, शेतकरी तरुणांचे प्रश्‍न अशा सर्व समस्यांमधून भारतमातेची सुटका व्हावी म्हणून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा हाती घेतली आहे. माता भगवती निश्‍चितच धावून येईल, असा विश्‍वास गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com