कर्जमाफी मिळेल तेव्हाच शेतकऱ्यांची दिवाळी - सुळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

अशोक चव्हाणांचे यश 
""नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे काम आणि कॉंग्रेसचे योगदान कारणीभूत ठरले आहे. संस्कृतीचे धडे देणाऱ्या राजकीय पक्षांतर्फे खालच्या स्तराला जाऊन प्रचार केला गेला. त्यास स्थानिकांनी प्रतिसाद दिला नाही. चव्हाण यांनी "डिग्निफाइड' प्रचार केला,'' असेही सुळे यांनी सांगितले. 

नाशिक - ""शेतमालाला हमीभाव देण्यास सरकार उदासीन आहे. त्यातच पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचा असा उच्चार केल्यावर आम्ही त्यांचे स्वागत केले; पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी प्रेमाने केलेली कर्जमाफी नाही; ती फसवी आहे,'' अशी टीका करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्जमाफी मिळेल तेव्हाच शेतकऱ्यांची दिवाळी असेल,'' असे शुक्रवारी स्पष्ट केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या "जागर युवा संवाद' कार्यक्रमातंर्गत खासदार सुळे या नाशिकमध्ये आल्या आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर ऍड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, की सरकार नेहमी निवडणुकांच्या "मोड'मध्ये असते; पण प्रशासनावर लक्ष ठेवून सामान्यांची सेवा करण्याचा विसर पडतो. आम्हाला संघर्षयात्रा करावी लागल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला. आता त्याच्या अंमलबजावणीचा खोळंबा सुरू आहे. 

शेतकऱ्यांच्या कांद्याला चार पैसे मिळत आहेत म्हटल्यावर सरकारी यंत्रणांकडून दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. केशरी शिधापत्रिकेमधून साखर काढून टाकण्यात आली. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर शेतकऱ्यांवर अन्याय होत राहिल्यास आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

Web Title: nashik news supriya sule farmer