विशेष मुलांच्या आरोग्यात पोहण्यातून सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नाशिक - सातपूरमधील महापालिकेचा जलतरण तलाव... वेळ सकाळची. वीस फूट पाण्यात सरसर पोहणारी विशेष मुले साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतात. पाणी म्हटले की घाबरायला होते. पण विशेष मुलांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसांची लयलूट केली. त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होत आहे. ही सारी किमया अनिल निगळ यांच्या प्रशिक्षणातून शक्‍य झाली आहे. त्यांनी आता दृष्टिबाधित मुलांनाही पोहण्याचे धडे देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

विशेष मुलांना शाळांत वेगवेगळ्या ‘थेरपी’ शिकविल्या जातात. ज्यात भाष्य, नृत्य, योगा शिकविण्याचा समावेश असतो. या मुलांच्या विकासासाठी पोहणे आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टरांकडून समजल्यावर पालकांनी शहरातील विविध जलतरण तलावांकडे धाव घेतली. मात्र जलतरण तलावाच्या नियमात मुले बसत नसल्याने त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नव्हते. ही बाब श्री. निगळ यांना समजल्यावर त्यांनी नाशिक रोड येथील जिजामाता जलतरण तलावातील मुख्य व्यवस्थापिका माया जगताप यांना हा विषय सांगितला. त्यांची परवानगी घेऊन मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी श्री. निगळ यांनी स्वीकारली.

जणू मुलांची जडली पाण्याशी मैत्री
श्री. निगळ सातपूर भागात राहत असल्याने ते दरररोज सकाळी सहाला जलतरण तलावात उपस्थित राहत. ते मुलांशी संवाद साधू लागले. पाण्याला खूप घाबरणाऱ्या मुलांची भीती त्यांनी स्वतः पाण्यात उतरून घालविली. आता मुलांची पाण्याशी मैत्री जडलीय. श्री. निगळ मुलांचा व्यायाम करून घेतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्यात पालकांना बदल दिसू लागला आहे. श्री. निगळ यांची बदली सातपूरच्या जलतरण तलावासाठी झाली आहे. पालक आपल्या मुलांना घेऊन सातपूरमधील तरण तलावात जात आहेत. ही ९ ते १३ वर्षे वयोगटातील मुले दररोज सकाळी पोहायला येतात. त्यांना पोहण्याचे विविध प्रकार शिकविले जातात. 

विशेष मुलांचे स्नायू कमकुवत असतात. पोहण्यातून स्नायू भक्कम होऊन प्रतिकारशक्ती वाढते. तीन वर्षे वयावरील मुलांनी पोहायला हवे. पण डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायला हवा. पोहण्याबरोबर नृत्य केल्याने शारीरिकदृष्ट्या फायदा होतो. भविष्यात मला दृष्टिबाधित मुलांना पोहण्यास शिकवायचे आहे.
- अनिल निगळ, प्रशिक्षक, जलतरण तलाव, सातपूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news swimming