कर्मचाऱ्यांअभावी स्वाइन फ्लू कक्ष बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

जुने नाशिक - शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरू असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षास कर्मचारी नसल्याने चक्क कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे. कर्मचारी नसल्याने कित्येक दिवसांपासून कक्ष बंद करण्यात आला आहे. आरोग्य समितीच्या दौऱ्यानंतरही रुग्णालयाची परिस्थिती बदलली नसल्याने समितीही नवालाच असल्याचे बोलले जात आहे. 

जुने नाशिक - शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरू असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षास कर्मचारी नसल्याने चक्क कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे. कर्मचारी नसल्याने कित्येक दिवसांपासून कक्ष बंद करण्यात आला आहे. आरोग्य समितीच्या दौऱ्यानंतरही रुग्णालयाची परिस्थिती बदलली नसल्याने समितीही नवालाच असल्याचे बोलले जात आहे. 

शहरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत मृत्यूची संख्या 13 वर पोचली आहे. दिवसेंदिवस स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढच होत आहे. असे असताना महापालिका वैद्यकीय विभागास याचे गांभीर्य नसावे, असेच चित्र कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दिसत आहे. कित्येक दिवसांपासून येथील स्वाइन फ्लू कक्ष बंद आहे. कक्षात त्या वेळी नियुक्त करण्यात आलेल्या 18 पैकी 17 कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या अवघ्या दोन तासांत ओळखीचा फायदा घेत अन्यत्र बदली करून घेतली होती. त्यानंतर एकाच महिला कर्मचाऱ्याच्या खांद्यावर कक्षाची धुरा होती. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे त्याही महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती अन्य कक्षामध्ये करण्यात आली. त्यामुळे सध्या एकही कर्मचारी नसल्याने कक्ष बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कक्षातील यंत्रसामग्री धूळखात आहे. फ्लूने पीडित एखादा रुग्ण आलाच, तर त्यास किती वेळात उपचार मिळतील याबाबत नक्की काही सांगता येत नाही. कारण कर्मचारी तर नाहीच, शिवाय तज्ज्ञ डॉक्‍टरही नाही. रुग्ण आल्यास बिटको रुग्णालयातील डॉक्‍टरास बोलविण्यात येते. ते डॉक्‍टरही आपल्या सोयीनुसार रुग्णास तपासणीसाठी येत असल्याने रुग्णास उपचार मिळण्यास उशीर होतो. अशा वेळेस रुग्णास काही कमी-जास्त झाले तर त्यास जबाबदार कोण, असे प्रश्‍न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करीत आहेत. कक्षात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे वैद्यकीय विभाग सांगत आहे; पण कर्मचारी नियुक्त असते तर कक्ष बंद का आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची स्थिती 
रुग्णालयात 37 कर्मचारी, 32 नर्स, तसेच नऊ डॉक्‍टर आहेत. 37 कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी आजारी आहेत. दोन कर्मचारी आयुक्तांच्या बंगल्यावर सेवा बजावत आहेत. दोन कार्यालयीन शिपायांची सेवा बजावत आहे. चार शिपाई पदावरील कर्मचारी लिपिकांची भूमिका बजावत आहे. स्टाप नर्समधील तीन नर्स प्रसूती रजेवर आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांची शिफ्टप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांलयाच्या स्वच्छतेसह अन्य कामांवर परिणाम होत आहे. 

Web Title: nashik news swine flu employee