नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हेच आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नाशिक - आगामी काळात वाहनक्षेत्रात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. कार, दुचाकीच्या नेहमी बदलणाऱ्या मॉडेल्समुळे तंत्रज्ञान सतत प्रगत होत आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञांना सॉफ्टवेअरप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाबाबत कायम अपडेट राहावे लागणार आहे.  कुशल मनुष्यबळाचा पुरवठा टिकविणे, हे आव्हानात्मक आहे; परंतु त्यातील आव्हाने रोजगाराच्या संधींत परावर्तित होऊ शकतात.

नाशिक - आगामी काळात वाहनक्षेत्रात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. कार, दुचाकीच्या नेहमी बदलणाऱ्या मॉडेल्समुळे तंत्रज्ञान सतत प्रगत होत आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञांना सॉफ्टवेअरप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाबाबत कायम अपडेट राहावे लागणार आहे.  कुशल मनुष्यबळाचा पुरवठा टिकविणे, हे आव्हानात्मक आहे; परंतु त्यातील आव्हाने रोजगाराच्या संधींत परावर्तित होऊ शकतात.

नाशिक शहर, तसेच लगतच्या परिसरात सुमारे सव्वातीन लाख कामगार व नागरिक प्रत्यक्ष, तसेच अप्रत्यक्ष महिंद्र ॲन्ड महिंद्र उद्योगाशी जोडले गेले आहेत. केवळ नाशिकच नव्हे, तर पुणे, मुंबईसह अन्य वाहन उत्पादकांना सुटे भाग निर्मितीचे काम नाशिकमध्ये होते. हे उत्पादन विविध लघुउद्योगांद्वारे होते. महापालिकेला तज्ज्ञांनी नुकत्याच सादर केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात २०१६ अखेर ७.३२ लाख वाहनांची नोंद झाली आहे. त्यात वेगाने वाढ होत आहे. यात ७४.६ टक्के दुचाकी, तर १२.३ टक्के चारचाकी वाहने आहेत. यातील ३३ टक्के वाहने मालवाहतुकीचे काम करतात. खासगी वाहनांच्या वाढीमुळे कौशल्यविकास व रोजगाराच्या नव्या संधी आहेत. त्यात वाहनतळाच्या अडचणी सोडविणे, वाहतुकीचा वेग वाढविणे, सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार यावर उपाययोजना आवश्‍यक आहेत. 

मारुती सुझुकी, टोयोटा, ह्युंदाई, महिंद्र, टाटा मोटर्स, होंडा, फोर्ड, फोक्‍सवॅगन, शेवरलेट, रेनॉल्ट या दहा वाहन निर्मात्यांचे वितरक शहरात आहेत. याशिवाय जनरल मोटर्स, बीएमडब्ल्यू, ऑडी, पजेरो या आंतरराष्ट्रीय वाहनांचेही वितरक शहरात आहेत. त्यामुळे मोठी गुंतवणूक असल्याने त्याला लागणारे कुशल मनुष्यबळ हा कळीचा मुद्दा आहे. सध्या या वाहनांच्या मॉडेल्सचे सातत्याने किंबहुना दर सहा महिन्यांनी तांत्रिक क्षमतेत सुधारणा व विकास केला जातो. 

सुट्या भागांची सुधारित आवृत्ती सादर होते. त्यासाठी सध्याच्या मेकॅनिक्‍स, देखभाल सर्व्हिस आदींमध्ये कुशल कामगार अत्यंत आवश्‍यक आहेत. असे कामगार तयार करण्यासाठी सध्या वितरक, उत्पादक या दोन्ही स्तरांवर प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्यात शिक्षित युवकांचे प्रमाण कमी आहे. ते वाढविणे मोठे आव्हान आहे. त्याची वाढ करताना प्रतिवाहन दरमहा १.४ व्यक्ती एवढी रोजगारनिर्मिती शक्‍य असल्याचा अंदाज आहे. 

परराज्यांतील युवक पटकावतात संधी
सध्याच्या वाहनातील तंत्रज्ञान उच्च क्षमतेचे असल्याने दुरुस्ती सामान्य गॅरेजमध्ये होत नाही. वितरक अशा सेवांसाठी ग्रामीण भागातही त्याचे सेवा केंद्र उघडण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी मनुष्यबळाची मोठी उणीव आहे. दीर्घकालीन करारावर युवकांना वाहनचालक, दुरुस्ती- देखभाल, मेकॅनिक्‍स, पार्किंग, सुटे भाग विक्री, ब्रेकडाउन सर्व्हिस, व्हील अलायनमेंट यात रोजगाराच्या संधी. विविध संस्थांतील स्थिती पाहता सध्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतील अल्पशिक्षित मजुरांचे प्रमाण ८० टक्के आहे. 

वाहनांच्या देखभाल- दुरुस्तीत मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत. मात्र, सध्या कुशल कामगारांची उणीव आहे. तंत्रकुशल कामगार घडविण्याचे काम स्थानिक आयटीआय व खासगी संस्थांतर्फे करता येईल. 
- राजू गडाख, संचालक, अशोका टायर्स

वाहन उद्योगात गुणवत्तापूर्ण सुटे भाग ही मोठी समस्या आहे. याबाबत ‘निमा’ तसेच अन्य संस्थांतर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी कौशल्य वर्गाद्वारे नवे तंत्रज्ञ घडविण्यास वाव आहे. 
- संजय सोनवणे, संचालक, इंडील्यूब प्रा. लि.

ऑटोमोबाईल्स सेक्‍टरमध्ये नाशिकला अनेक लघू व मोठे उद्योग आहेत. त्यामुळे नावाजलेल्या संस्थांचे वितरक उपलब्ध आहेत. या संस्थांनी युवकांना प्रशिक्षण द्यावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. रोजगारनिर्मितीस चालना मिळेल.
- महेंद्र चांदवडकर, नाशिक

Web Title: nashik news technology