गुणवत्ताधारित शिक्षण व्यवस्थेसाठी प्रयत्न हवेत - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

नाशिक - शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातून समावेशकता आली असली, तरी गुणवत्तेची गरज आहे. 21व्या शतकात पैसा नव्हे तर गुणवत्ता हेच खरे भांडवल आहे. गुणवत्ततेतील "लर्निंग अबिलिटी'मध्ये महाराष्ट्राचा देशात 18वा क्रमांक होता. आम्ही प्रगत शैक्षणिक अभियान सुरू केल्यानंतर आता हा क्रमांक तीनवर आला असून, तो एकवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ज्ञान व गुणवत्तेवर आधारित शाश्वत विकासासाठी सरकार, संस्था, शिक्षक आणि पालक या सर्वांनी मिळून हे काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नाशिक रोडला पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवाचा शुभारंभात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश महाजन, कार्याध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, डॉ. विनायक गोविलकर, उद्योजिका गंगूताई व सिंधूताई धामणकर व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'तंत्रज्ञान व्यक्तिनिरपेक्ष आहे. जात, धर्म, पंथ, प्रांत न पाहता प्रत्येक गरजूला ज्ञान देण्याचे तंत्रज्ञानात सामर्थ्य आहे. भविष्यकाळ "इंटरनेट ऑफ थिंग्ज'चा आहे. त्यात भव्यतेपेक्षा आवश्‍यकता व नीटनेटकेपणा महत्त्वाचा ठरणार आहे. मोबाईल फोन हा बदलाचा निदर्शक आहे. याच तंत्रज्ञानाच्या उपयोगाने विकासाचा मार्ग अधिक विस्तारणार आहे. राज्यात जिल्हा परिषद शाळांतील 44 हजार शिक्षकांनी टेक्‍नोदूत होण्याची घोषणा केली आहे. ज्ञानाची सर्वांसाठी दारे उघडी करण्याची क्षमता असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: nashik news There should be efforts for quality education system