दारणा, भावली धरणाच्या सौंदर्याने पर्यटकांना मोहिनी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

नाशिक/इगतपुरी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या इगतपुरी तालुक्‍यातील दारणा आणि भावली धरणक्षेत्रात सध्या पर्यटकांचे जथे उतरू लागले आहेत.

जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नगर या जिल्ह्यांसह राज्य, परराज्यातील पर्यटकसुद्धा धरणांचे अवर्णनीय सौंदर्य अनुभवीत आहेत. विशेषतः दारणा आणि भावली धरणाचा परिसर पावसाळी सहलीचे नंदनवन ठरल्याचे दिसत आहे.

नाशिक/इगतपुरी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या इगतपुरी तालुक्‍यातील दारणा आणि भावली धरणक्षेत्रात सध्या पर्यटकांचे जथे उतरू लागले आहेत.

जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नगर या जिल्ह्यांसह राज्य, परराज्यातील पर्यटकसुद्धा धरणांचे अवर्णनीय सौंदर्य अनुभवीत आहेत. विशेषतः दारणा आणि भावली धरणाचा परिसर पावसाळी सहलीचे नंदनवन ठरल्याचे दिसत आहे.

सध्या पर्यायी मार्गाने मार्गक्रमण करताना अनेक अडचणी येत आहेत. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, सुधारित दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे बाहेरील पर्यटकांना अडणीचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील धरणांच्या परिसरातील निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पाहून आपल्या थकव्याचा विसर पडलेले बहुतांश पर्यटक आता आमचा मुंबई-शिर्डीला जाताना प्रवासाचा मार्ग यापुढे हाच राहील, असे सांगतात.

सेल्फीचा मोह टाळावा; सुरक्षाव्यवस्थाही हवी
सध्या दारणा धरणातून विसर्ग सुरू आहे. विसर्गाच्या पाण्याची पातळी, खोली जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना माहीत नसल्याने पर्यटक धबधबा व धरणाच्या कडेला आकृष्ट होतात. मग चालतो सेल्फीचा सिलसिला. या मोहापायी अनेक धोक्‍याच्या ठिकाणी फोटोशूट होते. तसेच परिसरात तळीरामांची वाढलेली संख्यादेखील चिंतेचा विषय असल्याचे काही पर्यटकांनी सांगितले. शिवाय पाण्यात अनेकांना अपघातात जीव गमवावा लागल्याने पाटबंधारे विभागाने दारणा धरणावर अंकुश ठेवण्यासाठी तत्काळ सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.

भावली, अशोका धबधबे ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण
तालुक्‍यातील अशोका आणि भावली धबधब्यांचा परिसर पावसाळ्यात गर्दीने फुलून गेला आहे. सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक येथे पाऊस आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. इगतपुरीपासून काही अंतरावर मानस हॉटेलच्या अगोदर डाव्या बाजूला पाच किलोमीटरवर भावली डॅम आहे. डॅमकडे जाणारा रस्ता सिमेंटचा चकाचक आहे, अगदी रस्त्यावरूनच हा धबधबा दिसतो. पावसाचे पांढरेशुभ्र पाणी तीन टप्प्यांतून पडत खाली येते, त्यामुळे एकाच वेळी तीन धबधबे पाहावयास मिळतात, धबधब्याकडे जाणारी वाट चांगली असल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांसाठी चहा व नाश्‍त्याची व्यवस्था स्थानिक लोकांनी अल्पदरात उपलब्ध करून दिली आहे, नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांसाठी हा धबधबा आकर्षण ठरत आहे. 

मानस हॉटेलच्या पुढे जव्हार रोडवर पाच किलोमीटर आत अशोका हा धबधबा प्रसिद्ध आहे. शाहरूख खान आणि करिना कपूरच्या अशोका या चित्रपटाचे चित्रीकरण या धबधब्याच्या परिसरात झाल्याचे बोलले जाते. त्यावरूनच या धबधब्याचे नाव अशोका आहे. या ठिकाणीही रोज हजारो पर्यटक हजेरी लावत असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. त्र्यंबकेश्‍वरजवळील सापगाव येथील धबधब्यांपेक्षा या वेळी इगतपुरी तालुक्‍यातील धबधबे या वर्षी पर्यकांना मोहवून टाकत आहेत.

Web Title: nashik news tourist on dharana ani bhavali dam