अवघ्या दोन तासांत पोलिसांचाच ‘यू-टर्न’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नाशिक - द्वारका येथील वाढत्या वाहतुकीचे नियोजन व शिस्त लावण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरणाने द्वारका सर्कल वळशाचा पर्याय रद्द करून एकतर्फी वाहतूक करून यू-टर्नचा पर्याय वाहनधारकांना खुला केला. परंतु त्या प्रयोगामुळे वाहनधारकांना आज मनस्ताप सहन करावा लागल्याने ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशीच प्रतिक्रिया वाहनधारकांच्या तोंडून ऐकायला मिळाली.

नाशिक - द्वारका येथील वाढत्या वाहतुकीचे नियोजन व शिस्त लावण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरणाने द्वारका सर्कल वळशाचा पर्याय रद्द करून एकतर्फी वाहतूक करून यू-टर्नचा पर्याय वाहनधारकांना खुला केला. परंतु त्या प्रयोगामुळे वाहनधारकांना आज मनस्ताप सहन करावा लागल्याने ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशीच प्रतिक्रिया वाहनधारकांच्या तोंडून ऐकायला मिळाली.

सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना आज अर्धा ते तासभर उशिराने कार्यालयात पोचावे लागले. जुने नाशिकमध्ये जाण्यासाठी मुंबई नाक्‍याला वळसा घालून जावे लागले. वाढत्या वाहतुकीमुळे काठे गल्ली ते मुंबई नाका, पखाल रोड, टाकळी रोड, कौट घाट रोड या समांतर रस्त्यांवर वाहतूक वाढल्याने एका रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांमध्ये विभागला गेल्याने त्या भागात वाहतूक वाढली.

दोन राष्ट्रीय महामार्गांच्या जंक्‍शनवर असलेल्या द्वारका चौकात वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार नवीन नाही. १९९५ पासून येथे नवनवीन प्रयोग राबविण्यात आले. सुरवातीला अशोका सर्कल अरुंद करण्यात आला. सर्व्हिस रोडनंतर येथे सिग्नल बसविण्यात आले. भुयारी मार्ग करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस व महापालिकेने वाढत्या वाहतुकीचा विचार करून प्रायोगिक तत्त्वावर यू-टर्नचा पर्याय स्वीकारला. त्यानुसार नाशिकहून नाशिक रोडकडे जाण्यासाठी ट्रॅक्‍टर हाउससमोरून यू-टर्न घ्यायचा, तर नाशिक रोडहून नाशिककडे जाताना वडाळा नाका चौफुलीपासून यू-टर्न पर्यायाचा आज प्रयोग घेण्यात आला. परंतु पहिल्याच दिवशी समस्या सुटण्याऐवजी अधिक जटिल झाली. पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा लागला. द्वारकासह ट्रॅक्‍टर हाउस, वडाळा नाका चौफुली, दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड, काठे गल्ली सिग्नल, टाकळी फाटा येथे वाहतूक ठप्प झाली. सर्वाधिक फटका जुने नाशिकमधून नाशिक रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीला बसला. वाहतूक ठप्प झाल्याने दुचाकीधारकांकडून नियमांचे उल्लंघन झाले. वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

यू-टर्न प्रयोगाचे परिणाम
 दुपारी एकपर्यंत द्वारका ते पौर्णिमा बसस्टॉपपर्यंत वाहनांच्या रांगा
 एक वाहन मार्गी लागण्यास लागला अर्धा ते पाऊण तास
 सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक ठप्प
 वडाळा नाका चौफुलीवर वाहनांच्या गर्दीमुळे मुंबई नाक्‍याकडून प्रवेश
 रिक्षा, टॅक्‍सीचालकांकडून असहकार्य
 वाढत्या वाहतुकीमुळे व्यवसाय ठप्प
 द्वारका भागातील प्रदूषणात वाढ
 वाहनधारकांना अतिरिक्त एक किलोमीटरचा फेरा

पोलिसांची माघार
वाहतूक कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘यू-टर्न’ योजना अमलात आणली. सकाळी दहाला सुरू झालेली योजना पोलिसानांच अधिक तापदायक झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच वाहतूक सुरू करण्यात आली. दोन तासांच्या प्रयोगातच वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. येथे उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला होता. वाढती वाहतूक आवरणे कठीण झाल्याने पोलिस व अधिकाऱ्यांची परस्परांवर चिडचिड सुरू झाली. अखेरीस साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी उपाययोजना गुंडाळली.

Web Title: nashik news traffic management by police