पंचवीस लाख झाडांची नाशिककरांवर छाया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

सरकारी जागेत सर्वाधिक झाडे
सरकारी जागेत १३ लाख ३२ हजार ९७७ झाडे आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४४ हजार २२८ झाडे आहेत. खासगी जागेत दोन लाख ५५ हजार ५६१ झाडे आहेत. ७ ते १० मीटर उंचीदरम्यान सात लाख ७० हजार २६७, तर सात मीटरपेक्षा कमी उंची असलेली पाच लाख ८१ हजार ४८२ झाडे आहेत.

नाशिक - महापालिकेने शहरातील वृक्षसंपदेचा आढावा घेण्यासाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत २५ लाख ४० हजार झाडे आढळली आहेत. २००७ मध्ये झालेल्या वृक्षगणनेच्या तुलनेत झाडांची संख्या वाढली आहे. अकरा महिन्यांपासून सुरू असलेल्या वृक्षगणनेत १९२ पेक्षा अधिक झाडांच्या जाती आढळल्या असून, त्यांचा आकडा तीस लाखांच्यावर जाण्याची शक्‍यता आहे.

नोव्हेंबर २०१६ पासून वृक्षगणना सुरू झाली आहे. यापूर्वी २००७ मध्ये वृक्षगणना झाली होती. मे. टेराकॉन इकोटेक प्रा. लि. संस्थेकडून गणनेचे काम सुरू आहे. २० डिसेंबर २०१७ पर्यंत गणना पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. २००७ मध्ये केलेल्या गणनेत महापालिका क्षेत्रात १९ लाख झाडे आढळली होती. या गणनेत ५७ प्रकारची दुर्मिळ झाडे आढळली. शेंद्री, वारस, मुचकुंद, सुरंगी, राई-आवळा, रबर ट्री, नागकेसर, दांडुस, लिची, शमी, कावस, वारस, व्हाइट बॉटल ब्रश, रुद्राक्ष, महारुख, माकड लिंबू, गेला, भद्रक्ष, धत्रीफल, पिपली, बुरलीवड, कलंब, लोखंडी, उंडी, रानचिकू, करमाळ आदींचा यात समावेश आहे. नाशिक रोडच्या प्रभाग एकोणीसमध्ये पाच लाख ६५ हजार ३६१ झाडे आढळली. इतर प्रभागांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ प्रभाग एकमध्ये चार लाख ९४ हजार ३२५ झाडे आहेत. ज्या भागातील झाडांची गणना झाली आहे. त्यात पाच ते दहा वर्षे वय असलेल्या झाडांची संख्या तीन लाख ९८ हजार १७७ आहे. अकरा ते वीस वर्षे वय असलेल्या झाडांची संख्या सर्वाधिक १२ लाख ८ हजार ५६३ आहेत. २१ वर्षांपेक्षा जास्त वय असणारी सुमारे ४० हजार ८०५ झाडे आढळली आहेत.

सोळा प्रभागांत गणना
एकतीस प्रभागांत गणना सुरू आहे. त्यातील १६ प्रभागांचे काम पूर्ण झाले आहे. प्रभाग १, ६ ते ८, १२ ते १४, १६, १८, २१, २३ ते २५, २९ ते ३१ प्रभागांचा समावेश आहे.

वृक्षगणनेत महत्त्वाचे
 चंदनाची १४,२५४ झाडे
 ५७ प्रकारची दुर्मिळ झाडे
 प्रभाग १९ मध्ये सर्वाधिक झाडे
 सरकारी जागेत सर्वाधिक झाडे
 जीपीएस, जीआय तंत्राचा वापर
 तीन मीटरपेक्षा अधिक उंचीच्या झाडांची गणना
 १० सेंटिमीटरपेक्षा अधिक जाडीचा बुंधा असलेल्या झाडांची गणना
 वड १४७१, तर पिंपळ २८४३

Web Title: nashik news tree