राज्यात "उडान'ला अखेर मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

"शिवसेनेच्या मोर्चाच्या दणक्‍यामुळे विमानसेवा सुरू करण्याची लेखी हमी मिळाली आहे. पण विमानसेवा सुरू होईपर्यंत लढाई संपणार नाही.
- हेमंत गोडसे (खासदार, नाशिक)

नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूरहून 15 डिसेंबरपासून सेवा; हेमंत गोडसेंच्या आंदोलनाला यश
नाशिक - राज्यातील "उडान' सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनानंतर 15 डिसेंबरपासून नाशिकप्रमाणेच औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूरसाठी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी लेखी हमी नागरी वाहतूक मंत्रालयातर्फे देण्यात आली.

राज्यातील विमानसेवेसाठी मुंबई विमानतळावर "टाइम-स्लॉट' द्यावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज नवी दिल्लीत केंद्र सरकार आणि जी. व्ही. के. कंपनीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने वर्षभरापूर्वी उडान योजनेची घोषणा केली होती. छोटी विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडणे हा हेतू त्यामागील आहे. योजनेअंतर्गत नाशिकसह सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आदी शहरे मुंबई विमानतळाशी जोडली जाणार आहेत. खासदार गोडसे यांनी सतत पाठपुरावा करूनही जी. व्ही. के. कंपनीने राज्यातील विमानतळांना मुंबईत "टाइम स्लॉट'चे कारण पुढे करत विमानसेवेला खीळ घातली. मात्र गुजरातमधील कांडला, सूरत, पोरबंदर येथील विमानतळांना ऑगस्टमध्ये "टाइम स्लॉट' उपलब्ध करून दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत अन्यायाची भावना तयार झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी नवी दिल्लीतील नागरी वाहतूक मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. आंदोलकांनी शिवसेना झिंदाबादच्या जोरदार घोषणा देत मंत्रालय परिसर दणाणून सोडला. मोर्चात गोडसे यांच्यासमवेत शिवसेनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष नीरज सेठी, उत्तर भारतीय संघाचे विनय शुक्‍ला, पंजाब प्रदेशाध्यक्ष योगिराज शर्मा, बिहारचे कोशलेंद्र शर्मा आदी सहभागी झाले होते. नागरी वाहतूक मंत्रालयाचे उषा पाधी, रुबिना अलीम, जी. के. चोखीयाल, उमेश भारद्वाज, अनुप पंथ या अधिकाऱ्यांनी विमानसेवेबद्दलचे पत्र गोडसे यांना दिले.

विमानसेवेचा मार्ग
मुंबई-नाशिक
पुणे-नाशिक-मुंबई
मुंबई-औरंगाबाद-मुंबई
मुंबई-कोल्हापूर-मुंबई
मुंबई-जळगाव-मुंबई
मुंबई-सोलापूर-मुंबई

Web Title: nashik news udan muhurt