सायरनचा आवाज घुमला अन्‌ अश्रूंच्या धारा

संदीप पाटील
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

विराणे -  महिला शेतमजुरांच्या मृत्यूने कालपासून निःस्तब्ध झालेल्या अजंग, वडेलसह पंचक्रोशीत काल दुपारी दोनच्या सुमारास शेतमजूर महिलांचे पार्थिव घेऊन गावात आलेल्या रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजाने प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रूंच्या धारा लागल्या अन्‌ सारे गाव सुन्न झाले. या सात सुवासिनींना मोक्षगंगेच्या (मोसम) तीरावर साश्रुनयनांनी निरोप दिला. 

विराणे -  महिला शेतमजुरांच्या मृत्यूने कालपासून निःस्तब्ध झालेल्या अजंग, वडेलसह पंचक्रोशीत काल दुपारी दोनच्या सुमारास शेतमजूर महिलांचे पार्थिव घेऊन गावात आलेल्या रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजाने प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रूंच्या धारा लागल्या अन्‌ सारे गाव सुन्न झाले. या सात सुवासिनींना मोक्षगंगेच्या (मोसम) तीरावर साश्रुनयनांनी निरोप दिला. 

महिला शेतमजूर दुर्घटनेनंतर कालपासून अवघी पंचक्रोशी व तालुका दुःखाच्या सागरात बुडाला आहे. या घटनेमुळे अजंग, वडेल, इंदिरानगर भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थ रात्रभर बचावकार्यासाठी धावाधाव करत होते. ती धावाधाव आज थांबली. भल्या पहाटेपासून अजंग बसस्थानक व वडेल चौपाटी माणसांच्या गर्दीने भरून गेली होते. सर्वत्र दुःखाची छाया जाणवत होती. दिवाळीचे आकाशकंदील व घरांवर केलेली रोषणाई काढली. सडा-रांगोळीची जागा अश्रूंनी घेतली होती. प्रत्येक अंगण पोरके दिसत होते. 

ग्रामस्थांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर सर्वांच्याच नजरा मालेगावकडून येणाऱ्या वाहनांकडे लागल्या होत्या. दोन्ही गावाचे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील नागरिक व सातही मृतांच्या नातलगांना मृतदेहांची प्रतीक्षा होती. डोक्‍यावरून सरकलेल्या सूर्याच्या साक्षीने सात रुग्णवाहिका दुपारी दोनच्या सुमारास एकापाठोपाठ एक गावात शिरल्या. त्यांच्या सायरनने अनेकांच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. निरागस शांतता व पशुपक्ष्यांचा किलबिलाटही बंद झाला होता. सुन्न झालेला प्रत्येक माणूस रुग्णवाहिकांच्या मागे जात होता. काहींनी थेट मोसमतीर गाठला. एरवी आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या सायरनचा आवाज ग्रामस्थांना मदत व दिलासा देणारा ठरत होता. आजचा रुग्णवाहिकेचा सायरन सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. गल्लोगल्ली हुंदक्‍याच्या आवाजाने सन्नाट्यात भर घातली. सातही सुवासिनींना अखेरचा निरोप देताना ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.

शेतमजूर महिलांकडून श्रद्धांजली
तालुक्‍यातील महिला मजुरीसाठी चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत वाहनाने मजुरीला जातात. शेतमजुरांना घेण्यासाठी आलेली शेतकऱ्यांची वाहने आज रिकाम्या हाताने परतली. धास्तीबरोबरच मृत भगिनींना श्रद्धांजली म्हणून शकडो महिला आज कामावर गेल्या नाहीत. अजंग दुर्घटनेतून शेतमजुरांच्या वाहतूक व सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला.

Web Title: nashik news virane Death of women workers