उन्हामुळे पूर्व प्रभागात पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

जुने नाशिक - वाढत्या उन्हामुळे पूर्व विभागातून होणाऱ्या पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. महापालिकेच्या टॅंकरव्यतिरिक्त खासगी टॅंकरने विभागात पाणीपुरवठा करण्याची वेळ विभागावर आली आहे.

जुने नाशिक - वाढत्या उन्हामुळे पूर्व विभागातून होणाऱ्या पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. महापालिकेच्या टॅंकरव्यतिरिक्त खासगी टॅंकरने विभागात पाणीपुरवठा करण्याची वेळ विभागावर आली आहे.

पूर्व विभागास पाणीपुरवठा करणाऱ्या जीपीओ जलकुंभावर वाढत्या मागणीमुळे पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त ताण पडत आहे. इतर वेळेस पाणी टॅंकरच्या दैनदिन दोन ते तीन फेऱ्या होत असताना सध्या सुमारे 13 फेऱ्या होत आहेत. रोज लागणाऱ्या सुमारे 20 हजार लिटर पाण्याच्या जागी 40 हजार लिटर पाणी लागत असल्याने पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. विशेषतः विभागातील वडाळागावाच्या विविध भागांत पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. पाण्यावरून अधिकारी व नागरिकांमध्ये वादही झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून टंचाईग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. येथील विविध नऊ भागांत एक अशा पाच हजार लिटरच्या नऊ पाण्याच्या टाक्‍या महालिकेच्या माध्यामतून बसविण्यात आल्या आहेत. त्यात पाणी भरण्यासाठी महापालिकेकडून दोन खासगी टॅंकर अधिग्रहीत करण्यात आले. दिवसातून तीन ते चार फेऱ्या करून याठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही महेबूबनगर, समतानगर, साठेनगर, वडाळा रोड भागातून पाण्याची मागणी होतच आहे. बऱ्याच नागरिकांकडून खासगी टॅंकरच्या माध्यमातून पाण्याची मागणी भागवून घेतली जात आहे. त्यामुळे खासगी टॅंकरही जीपीओ पाण्याच्या टाकीवरून पाण्याचा भरणा करत आहे.

खासगी टॅंकरचे दर
पाणी भरण्यासाठी येणाऱ्या खासगी टॅंकरला महापालिकेकडून काही प्रमाणात दर आकारले जात असतात. एक हजार 200 लिटरसाठी 100 रुपये, पाच हजार लिटरसाठी 275, तर आठ ते दहा हजार लिटरसाठी 400 रुपये आकारले जातात.

शोपिस ठरणारे जलंकुभ
जीपीओ जलकुंभावर वाढत असलेला अतिरिक्त ताण पाहता महापालिकेकडून त्याचठिकाणी काही वर्षांपूर्वी 20 दशलक्ष लिटरचा नवीन जलकुंभ उभारण्यात आला होता. त्यानंतर एकच वेळेस तो जलकुंभ भरण्यात आला होता. पण त्यास गळती लागल्याने तेव्हापासून आजपर्यंत तो जलकुंभ भरण्यात आला नसल्याने सध्या तो शोभेचा विषय ठरत आहे.

Web Title: nashik news water demand double increase