नाशिककरांना घर, पाणीपट्टीवाढीचा तडाखा

नाशिककरांना घर, पाणीपट्टीवाढीचा तडाखा

नाशिक - स्मार्टसिटी, अमृत योजनेंतर्गत असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तसेच नगरसेवकांना विकासनिधी हवा असेल, तर घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करावीच लागेल. या प्रशासनाच्या दबावाच्या तंत्राला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष बळी पडला असून, करवाढीच्या प्रस्तावाला जशीच्या तशी मंजुरी दिली आहे. शिवसेनेने विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या विरोधाला फारसे महत्त्व दिले नाही. घरपट्टीत १८, तर पाणीपट्टीत दर वर्षी २० टक्के अशी पाच वर्षांत १२० टक्के दरवाढ केली आहे. पुढील आर्थिक वर्षापासून करवाढ अमलात येणार आहे.

नाशिकमध्ये २२ वर्षांत करांमध्ये वाढच झालेली नाही, असा वारंवार दावा करत प्रशासनाने करवाढीचे प्रस्ताव ठेवले व ते तितक्‍याच वेगाने फेटाळले. यंदाही फेब्रुवारीत प्रशासनाकडून प्रस्ताव ठेवला; पण सत्ताधारी मनसेने विरोध करत तो फेटाळला. कर व दरवाढीचा अधिकार असलेल्या स्थायी समितीवर एकदा प्रस्ताव फेटाळल्यानंतर तो तीन महिने सादर करता येत नाही. यादरम्यान महापालिकेत भाजपची सत्ता आली. जूनमध्ये तीन महिन्यांची मुदत संपल्याबरोबर प्रशासनाकडून करवाढीचा प्रस्ताव सादर झाला. आज त्यावर चर्चा झाली. उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी बावीस वर्षांत करवाढ न झाल्याने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी करवाढ आवश्‍यक असल्याचे समर्थन केले. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्मार्टसिटी व अमृत प्रकल्पांसाठी करवाढ आवश्‍यक असल्याचे समर्थन केले. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी करवाढीला संमती दिली.

नळजोडणी अन्‌ टॅंकरही महागले
नळजोडणी शुल्कात दुपटीने वाढ झाली आहे. पाऊण इंची नळजोडणीसाठी ७५ रुपयांवरून दीडशे रुपये दर केला आहे. एक इंचीसाठी शंभर रुपयांवरून दोनशे रुपये, दीड इंचीसाठी तीनशे रुपयांवरून सहाशे, दोन इंचीसाठी पाचशेवरून हजार, तर तीन इंचीसाठी एक हजारावरून दोन हजार रुपये वाढ केली आहे. एक हजार लिटर पाण्याच्या टॅंकरसाठी शंभर रुपयांचा दर दोनशे रुपये आहे. चार जार लिटर टॅंकर पाण्यासाठी २७५ रुपयांवरून ४५० रुपये, सहा हजार रुपये लिटर पाण्यासाठी साडेसहाशे, आठ हजार लिटर पाण्याच्या टॅंकरसाठी चारशेवरून साडेसातशे, तर दहा हजार लिटर पाण्याच्या टॅंकरसाठी एक हजार पन्नास रुपये दर आकारले जाणार आहेत.

दंडात्मक शुल्कात वाढ
कच्चा रोड फोडल्यास प्रतिचौरस मीटर एक हजार २८० रुपये मोजावे लागतील. डांबरी रोड फोडल्यास एक हजार ९२०, तर काँक्रिट रस्ता फोडल्यास तीन हजार २०० रुपये प्रतिचौरस मीटर दर मोजावे लागणार असून, ही वाढ सध्याच्या शुल्काच्या साठ टक्के आहे.

भाजपचे समर्थन, शिवसेनेचा विरोध
भाजपचे शशिकांत जाधव यांनी करवाढीचे समर्थन करताना प्रशासनाने अजून वाढ करावी, असे सुचवले. शिवसेनेचे सूर्यकांत लवटे, डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांनी विरोध करताना मिळकत सर्वेक्षण करावे, करबुडव्यांवर कारवाई करावी, अगोदर पुरेशा सुविधा पुरविण्याची मागणी केली.

घरपट्टीतील दरवाढ
सर्वसाधारण करात प्रत्येक टप्प्यात पाच टक्के करवाढ होईल. स्वच्छता करात तीन टक्के, जललाभ कर व पथकरात दोन, शिक्षण करात एक टक्का, मलनिस्सारण लाभ करात पाच टक्के अशी एकूण अठरा टक्के करवाढ केली आहे. घर व पाणीपट्टी करातून महापालिकेला वार्षिक १३ कोटी रुपये मिळण्याचा दावा केला आहे.

पाणीपट्टीतील दरवाढ
पाणीपट्टीत सध्या हजार लिटरला पाच रुपये दर आहे. २०१८-२०१९ मध्ये ४० टक्के दरवाढ होणार आहे. नंतर टप्प्याटप्प्याने दर वर्षी २० टक्के वाढ होईल. २०२२-२०२३ मध्ये घरगुती पाण्याचे दर हजार लिटरला अकरा रुपये होतील. बिगरघरगुती दर तीस टक्के, तर व्यावसायिक दरात पाच वर्षांत दर वर्षी वीस टक्के दरवाढ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com