स्वच्छतेच्या पाहणीमागे सत्ताधाऱ्यांचं दडलंय काय?

नाशिक - शहरातील कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटची पाहणी करताना महापौर रंजना भानसी. शेजारी उपमहापौर प्रथमेश गिते, दिनकर पाटील, सतीश कुलकर्णी, गजानन शेलार आदी.
नाशिक - शहरातील कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटची पाहणी करताना महापौर रंजना भानसी. शेजारी उपमहापौर प्रथमेश गिते, दिनकर पाटील, सतीश कुलकर्णी, गजानन शेलार आदी.

नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सध्या ग्रामीण भागाची पाहणी करत आहे. असे असतानाच दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही शहरातील अस्वच्छतेच्या ठिकाणांना अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा सर्व अट्टहास आताच कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत असून, सत्ताधाऱ्यांना नेमके शहरातील कचऱ्याचे ढीग तर निदर्शनास आणावयाचे नाहीत ना, अशीही शंका व्यक्त होत आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या वर्षी ५६, तर दुसऱ्या वर्षी १५३ वा क्रमांक आल्याने गडबडलेल्या महापालिका प्रशासनाने यंदा स्वच्छ भारत अभियानात पहिल्या दहा शहरांत येण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी व्यावसायिक ठिकाणी स्टॅंडपोस्ट डस्टबिन लावणे, स्वच्छतेत संस्था व नागरिकांना सहभागी करून घेणे, कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कमी करणे आदी उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी ४ जानेवारीपासून केंद्र सरकारचे पथक दाखल झाले आहे. प्रथम जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वरपासून स्वच्छता सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. स्वच्छतेत शहराचा वरचा क्रमांक आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे महापौर रंजना भानसी व सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक कचऱ्याची ठिकाणे शोधून प्रशासनाला अडचणीत आणत असल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे.

समितीच्या तोंडावर भेटीचे गुपित
पहिल्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी, त्यानंतर जलतरण तलावांची पाहणी, तर आज महापौरांच्या भेट मोहिमेत सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी यांनी विविध भागांत पाहणी केली. प्रशासनावर वचक बसविण्यासाठी महापौरांचा उपक्रम स्तुत्य असला, तरी केंद्रीय सर्वेक्षण पथकाचा दौरा आटोपल्यानंतरही तपासणी शक्‍य असल्याचे मत व्यक्त होत आहे.

अस्वच्छता अन्‌ दुरवस्थाच अधिक
जिल्हाधिकारी कार्यालयासह छत्रपती शिवाजी उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मेळा बसस्थानक, सेंट्रल बसस्थानक, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड, शरणपूर रोड, फुले मार्केट, फाळके रोड या भागात आज पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. दुभाजकांमध्ये अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, उद्यानांची दुरवस्था आढळली. नियमित स्वच्छतेसह समस्यांचे निराकरण करण्याची सूचना महापौर भानसी यांनी केली. या वेळी नगरसेवक गजानन शेलार, हिमगौरी आडके, स्वाती भामरे आदी उपस्थित होते.

बुधवारी, रविवारी स्वच्छतेचे काम
स्वच्छ भारत अभियानात नागरिक व संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आज महापालिकेत महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली रामायण निवासस्थानी बैठक झाली. यात औद्योगिक विभागात दर बुधवारी व रविवारी स्वच्छतेचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील निमा, आयमा, क्रेडाई, आयएमए, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, लायन्स क्‍लब, रोटरी क्‍लबचे सदस्य उपस्थित होते. या वेळी उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर उपस्थित होते. उद्योजकांनी शहरातील रस्ते दुभाजक, उद्याने, चौक विकसित करण्यात सहभाग नोंदविण्याचे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com