वाइन उद्योग दहा वर्षांत अन्नप्रक्रियेत 'टॉप थ्री'मध्ये

वाइन उद्योग दहा वर्षांत अन्नप्रक्रियेत 'टॉप थ्री'मध्ये

जितकी संधी परकीय गुंतवणुकीला, तितकीच कौशल्यविकासालाही

नाशिक - गेल्या पाच वर्षांत मंदीच्या स्थितीमुळे वाइन उद्योगाला अनेक दिव्यातून जावे लागले असले, तरी पुढील दहा वर्षांत वाइन उद्योग हा अन्नप्रक्रिया उद्योगातील ‘टॉप थ्री’ उद्योगात राहणार असल्याचा अहवाल अनेक उद्योगविषयक सेवा संस्थांनी दिलेला आहे. फ्रेश टॅलेंटला वाव देणाऱ्या वाइन उद्योगात कुशल मनुष्यबळाची चणचण आहे. जितकी संधी गुंतवणुकीला तितकीच कौशल्यविकासाला या उद्योगात आहे.

द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले असून, चाळीस छोट्या-मोठ्या वायनरीमुळे नाशिकच्या या उद्योगाला आगामी पाच वर्षांत टेस्टिंग, प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगमध्ये किमान पाच हजार अतिरिक्त कुशल मनुष्यबळाची गरज आहे. या तीन क्षेत्रांव्यतिरिक्त वाइन उद्योगाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे सतरा क्षेत्र असून, त्यात सुमारे साठ हजार मनुष्यबळाची गरज आहे. या एकमेव क्षेत्रात मागणीनुसार मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे.    

सध्या नाशिकमध्ये छोट्या-मोठ्या चाळीस वायनरीज आहेत. सुरवातीला दीड हजार कुशल मनुष्यबळाला रोजगार पुरविणाऱ्या या उद्योगाची २०११ मध्ये एकत्रित उलाढाल केवळ ९५ कोटी होती. केंद्र सरकारने या उद्योगात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी दिल्याने अनेक गुंतवणूकदारांनी पन्नास कोटी रुपयांच्या आसपास गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने ब्रॅन्डिंग आणि वितरणाशी संबंधित आहे. थेट नवीन वायनरीत गुंतवणूक झालेली नसली, तरी फ्रान्स, इटलीतील तीन कंपन्या गुंतवणुकीस इच्छुक आहेत. 

वाइनचा खप गेल्या पाच वर्षांत तब्बल १२० टक्‍क्‍यांनी वाढला. हा उद्योग मुळातच भारतात बाल्यावस्थेत असल्याने उत्पादनवाढीला सर्वाधिक वाव आहे. थ्री स्टार आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये वाइन टेस्टिंग संस्कृती रुजल्याने या हॉटेल्समध्ये वाइन टेस्टरची गरज निर्माण झाली आहे.  भारतात गेल्या वर्षी १८ दशलक्ष लिटर वाइनचे उत्पादन झाले असून, निर्यातीत साठ टक्के वाढ झाली आहे. टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत वाइननिर्मितीचे परिपूर्ण ज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी आहे. पुढील पाच वर्षांत अन्नप्रक्रिया उद्योगाला ५० टक्के अर्धकुशल आणि शंभर टक्के अतिरिक्त कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. ती पूर्ण करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित विशेष महाविद्यालय आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांची गरज आहे. वाइनचे मार्केटिंग प्रामुख्याने हाय प्रोफाइल क्षेत्रात करण्यासाठी विशेष वितरण व्यवस्थापकांची गरज असते. स्पर्धक कंपन्यांतील व्यवस्थापकांना आपणाकडे खेचून घ्यावे लागत आहे. निव्वळ वितरणाला किमान दीड हजार मनुष्यबळाची गरज असल्याची माहिती वाइन उद्योगातील प्रमुख अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’बरोबर बोलताना दिली. 

वाइन टुरिझममधून रोजगारनिर्मिती
फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, स्पेन, इटली, न्यूझीलंड या देशात वाइन टुरिझम हे स्वतंत्र क्षेत्र विस्तारले असून, त्याची उलाढाल काही कोटी डॉलरच्या घरात गेली आहे. इटली आणि फ्रान्सच्या एकूण पर्यटनात वाइन टुरिझमचा वाटा तब्बल २८ टक्के आहे. भारतात सुलाने वाइन टुरिझम संकल्पना रुजविली असून, २००८ पासून सुला फेस्टच्या माध्यमातून सुमारे पाच लाख देशी-विदेशी पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला जागतिक हातभार लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com