अंबडच्या महालक्ष्मीनगरमधील दारू दुकान पाडले बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

सिडको - अंबडच्या महालक्ष्मीनगरमधील दारू दुकान आज सायंकाळी नागरिकांनी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बंद पाडले. याबाबत पोलिसांना नागरिकांनी निवेदनही दिले. हे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला.

सिडको - अंबडच्या महालक्ष्मीनगरमधील दारू दुकान आज सायंकाळी नागरिकांनी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बंद पाडले. याबाबत पोलिसांना नागरिकांनी निवेदनही दिले. हे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला.

महालक्ष्मीनगरमध्ये मुख्य रस्त्यावर सर्वे क्रमांक २२६-ए-१ वरील एका गाळ्यात सोनाली वाइन शॉप सुरू झाले. हे दुकान मध्यवस्तीत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होईल, म्हणून आज सायंकाळी नगरसेवक दीपक दातीर, दिलीप दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, राकेश दोंदे, निवृत्ती दातीर, बाळा दराडे यांच्यासह नागरिक जमा झाले. नागरिकांनी मालकाला दुकान बंद करण्याची मागणी करीत दुकानासमोर आंदोलन सुरू केले. दुकानामुळे मद्यपींचा त्रास होईल, म्हणून महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हे दुकान कायमस्वरूपी बंद करावे व इतर घोषणा नागरिकांनी दिल्या. दुकानामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असे नागरिकांचे म्हणणे असून, राज्य उत्पादनशुल्क विभागाने दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली.  

दरम्यान, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड कर्मचाऱ्यांसह तेथे आले. आंदोलनकर्त्या महिलांनी दुकान बंद करण्याची मागणी करीत निवेदन दिले. काही नागरिकांनी दुकानाचे शटर ओढून दुकान बंद केले. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या दुकानामुळे महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढतील व नागरिकांचेही स्वास्थ्य बिघडेल म्हणून पोलिसांनी दुकान बंद करण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल. श्री. कड यांनी दुकानाबाबत आम्ही नागरिकांच्या भावना उत्पादनशुल्क विभागाला कळविणार आहोत व दुकान बंद करण्याचा अहवाल पाठविणार आहोत, असे सांगितले. 

दारू दुकानावर पोलिसांचा छापा
परिसरात किराणा दुकानातून अवैध दारूविक्री होत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली. दारू दुकानाचे आंदोलन संपल्यानंतर  अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी कर्मचाऱ्यांसह दुकानात छापा टाकून मद्यसाठा जप्त केला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

भरवस्तीत व मुख्य रस्त्यालगत दारू दुकान सुरू होते. आधीच या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. हे दुकान सुरू झाले, तर मोठा अनर्थ होण्याची शक्‍यता आहे. हे दुकान सुरू राहिल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल.
- दीपक दातीर, नगरसेवक

Web Title: nashik news wine shop