मद्यदुकानाविरोधात रणरागिणींचा उद्रेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - तिडके कॉलनीतील लंबोदर एव्हॅन्यूमधील रणरागिणींचा आज दारूच्या दुकानाविरोधात उद्रेक झाला. स्थलांतरित दारूच्या दुकानाला विरोध असतानाही हे दुकान सुरू करण्यासंबंधी प्रशासनाने घेतलेल्या संदिग्ध भूमिकेमुळे त्याविरोधात आंदोलन चिघळणार, हे स्पष्ट झाले आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची भेट घेत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली. 

नाशिक - तिडके कॉलनीतील लंबोदर एव्हॅन्यूमधील रणरागिणींचा आज दारूच्या दुकानाविरोधात उद्रेक झाला. स्थलांतरित दारूच्या दुकानाला विरोध असतानाही हे दुकान सुरू करण्यासंबंधी प्रशासनाने घेतलेल्या संदिग्ध भूमिकेमुळे त्याविरोधात आंदोलन चिघळणार, हे स्पष्ट झाले आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची भेट घेत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली. 

लंबोदर अपार्टमेंटमध्ये ३४ कुटुंबे राहतात. या अपार्टमेंटच्या नोंदणीत गाळे हॉटेल व दारू दुकानांना न देण्याची बाब समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, या अपार्टमेंटमधील गाळा दारू दुकानासाठी भाड्याने देण्यात आला आहे. दुकानाला भाड्याने देण्यातून नोंदणीच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याची तक्रार करीत त्यास विरोध दर्शविण्यासाठी महिला आक्रमक बनल्या. आज दुपारी दारू दुकानाचे मालक खासगी सुरक्षारक्षकांना घेऊन वाहनामधून बाटल्या घेऊन आले असताना महिला एकत्र झाल्या. गोंधळाला सुरवात होताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा सुरू असताना महिला थेट गाळ्यात शिरल्या आणि त्यांनी दारूच्या बाटल्यांची खोकी रस्त्यावर आणून ठेवली आणि वाहनातून खोकी उतरविण्यास प्रतिबंध केला. परिस्थिती हाताच्या बाहेर जात असल्याचे पाहून पोलिस अधिकाऱ्यांनी दारूच्या बाटल्यांचे वाहन घेऊन जाण्यास दुकानदाराला सांगितले.

लोकप्रतिनिधींकडे लक्ष
दारूच्या दुकानाला असलेला विरोध ‘लंबोदर’मधील रहिवाशांनी आमदार, नगरसेवकांची भेट घेऊन सांगितला होता. प्रत्यक्षात मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी महिलांच्या आंदोलनाची दखल घेतल्यामुळे या पार्श्‍वभूमीवर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून मिळत नसलेला प्रतिसाद पाहून कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट
येथील महिलांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. या भेटीत पंधरा दिवसांची वेळ देत सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. हुतात्मा स्मारकात श्रीमती पाटकर यांना भेटून प्रशासनातर्फे सहकार्य केले जात नसल्याचे गाऱ्हाणे महिलांनी मांडले. तसेच, त्यांना जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. ही चर्चा एकीकडे सुरू असताना रस्त्यावर ठेवलेल्या खोक्‍यातील बाटल्या संतप्त महिलांनी आडव्या केल्या. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित आणि नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी दारू दुकानासाठी विरोध करणाऱ्या महिलांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

Web Title: nashik news wine women