डॉक्‍टरकडून खंडणी घेताना महिला वकिलास अटक

डॉक्‍टरकडून खंडणी घेताना महिला वकिलास अटक

नाशिक - चुकीचे औषधोपचार केल्याचा आरोप करीत एका वकील महिलेने सातपूर परिसरातील डॉक्‍टर महिलेकडे अडीच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास खोट्या केसेस दाखल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या डॉक्‍टर महिलेने आज पोलिस उपायुक्तांची भेट घेतली. पोलिसांनी सापळा रचून वकील महिलेसह पाच संशयितांना मुंबई नाका परिसरातून अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

सातपूर परिसरातील डॉ. अनिता नरेंद्र बेडळे (वय ४६, रा. दुर्गेश अपार्टमेंट, सातपूर) यांचे आत्मीयता हेल्थ क्‍लिनिक आहे. त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी एक युवती डोके दुखण्यावर उपचारासाठी आली होती. संशयित वकील महिला कामिनी माणिकशा खेरूडकर (रा. बंगला नं. २२, राणेनगर) ही आली. त्या युवतीवर चुकीचे औषधोपचार केल्याने साइडइफेक्‍ट झाल्याचा आरोप केला. त्या मोबदल्यात अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्या वेळी डॉ. अनिता बेडळे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, कामिनी खेरूडकर हिने पोलिसांत खोट्या केसेस दाखल करून बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने डॉ. बेडळे पैसे देण्यास तयार झाल्या. त्यानंतरही खेरूडकर सतत पैशांची मागणी करीत होती. त्या वेळी डॉ. बेडळे यांनी पैसे जमविण्यासाठी वेळ मागितला. 

दरम्यान, डॉ. बेडळे यांनी आज दुपारी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना आपबीती सांगितली. उपायुक्त पाटील यांनी महिलेला अटक करण्यासाठी पथक तयार केले. वकील महिलेला पैसे देण्यासाठी डॉ. बेडळे यांनी संपर्क साधला असता त्यांनी कॅनडा कॉर्नर येथे बोलविले. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला. मात्र संशयित महिला आलीच नाही. त्यानंतर पुन्हा संपर्क साधला असता, तिने शताब्दी हॉस्पिटलजवळ बोलविले. तेथे सापळा रचला असता सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास संशयित वकील महिला चार साथीदारांसह आली. तिने पैशांची कॅरिबॅग (कॅरिबॅगमध्ये कागदी बंडल होते) ताब्यात घेतली. त्या वेळी तिने डॉ. बेडळे यांना ‘पैसे संपूर्ण आहेत ना, नसले तर जवळ मुंबई नाका पोलिस ठाणे असून, लगेच केस दाखल करून तुला अडकून टाकेन,’ असा दमही भरला. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी संशयित कामिनी खेरूडकरसह ॲड. मधुकर नाठे (४७, रा. बंगला नं. २, पाथर्डी फाटा), कमलेश लांडगे (२६, रा. चेतनानगर), अर्जुन रणशूर (१९, रा. सेंट लॉरेन्स शाळेसमोर, सिंहस्थनगर, सिडको), राकेश पाटील (३४, रा. अनंता रो-हाउस, वासननगर, पाथर्डी फाटा) यांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत रात्री उशिरापर्यंत वकील महिलेसह पाच संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांपैकी ॲड. नाठे यांचे कान्हेरेवाडीत चेंबर असून, ते जिल्हा न्यायालयात वकिली करतात. वकील महिला कामिनी खेरूडकर हिचा पती अमेरिकेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव, मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणिता पवार, मनोज शिंदे यांनी बजावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com