विशी-तिशीतील युवक-युवतींना कर्करोगाचा विळखा

नरेश हाळणोर
बुधवार, 31 मे 2017

नाशिक - तंबाखूसेवनामुळे साठीनंतर उद्‌भवणारा कर्करोग अलीकडे विशी-तिशीच्या युवकांना जडत असून, तंबाखूपेक्षाही घातक रसायने वापरून खुलेआम विक्री होणारे गुटखा-जर्दा, विविध पानमसाले यास कारणीभूत आहेत. 

नाशिक - तंबाखूसेवनामुळे साठीनंतर उद्‌भवणारा कर्करोग अलीकडे विशी-तिशीच्या युवकांना जडत असून, तंबाखूपेक्षाही घातक रसायने वापरून खुलेआम विक्री होणारे गुटखा-जर्दा, विविध पानमसाले यास कारणीभूत आहेत. 

आश्‍चर्याची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या स्त्रिया उच्चभ्रू वर्गातील आहेत. सामाजिक प्रबोधन आणि कायदेशीर कारवाईनंतरही हे वाढते प्रमाण चिंतनीय असून, ‘टोबॅको फ्री सोसायटी’ उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अलीकडे तंबाखूच्या विविध प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. घातक रसायने वापरून गुटखा, जर्दा, पानमसाले खुलेआमपणे विक्रीला असल्याने त्याचे आकर्षण तरुणवर्गामध्ये असते. परिणामी कधी काळी साठीनंतर जडणारा कर्करोग अलीकडे विशी-तिशीतील तरुणांना होत आहे. स्त्रियांमध्येही गुटखा वा जर्दा-पानमसाल्यांमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येत ७० टक्के युवा वर्गाची संख्या आहे. युवा वर्गातील ५० ते ६० टक्के तरुण या व्यसनाच्या अधीन झाले असून, त्यांना कर्करोग बळावलेला आहे, तर चाळीस टक्के तरुणवर्ग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सततच्या सेवनाने कर्करोग जडून मृत्यूच्या दारात आहेत. उच्चभ्रू सोसायटीतील तरुणी-महिलांमध्ये पानमसाल्याचे सेवन वाढत असून, त्यांच्यातील कर्करोगाचे प्रमाण आज ३० टक्‍क्‍यांवर पोचले आहे. घातक अशा गुटख्यांवर कायदेशीर बंदी घातली गेली; परंतु तरीही पानमसाल्यांच्या नावाखाली चालणारा गुटख्याचा खुला बाजार सुरूच असून, तो सहज उपलब्ध होत आहे. परिणामी तरुणवर्ग आकर्षिला जाऊन बंदी नावालाच राहिली आहे. सखोल सामाजिक प्रबोधनाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कायदेशीर बंदी नावापुरतीच आहे. यासाठी ‘टोबॅको फ्री सोसायटी’ उपक्रम राबविण्याची गरज आहे. जिथे एकीकडे तंबाखूसेवनाचे दुष्परिणाम दाखविले जातात, त्याच वेळी पानमसाल्यांच्या जाहिरातीही खुलेआम केल्या जातात. तरुण वर्गात कर्करोगाचे प्रमाण वाढले ही बाब सामाजिक दृष्टिकोनातून गंभीर आहे. 
- डॉ. राज नगरकर, कर्करोगतज्ज्ञ, मानवता क्‍युरी सेंटर

Web Title: nashik news world tobacco day tobacco cancer youth

टॅग्स