'यिन'च्या मंत्र्यांनी मांडले वर्षातील उपक्रमांचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नाशिक - महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वाटचालीतील स्थित्यंतरे, मुख्यमंत्री निवडीचे राजकारण असा राज्याच्या राजकारणाचा इतिहास "यिन' मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी जाणून घेतला. सोशल मीडियाची ताकद जाणून घेताना तरुणांवर असलेली जबाबदारी यासह अन्य विषयांवर सभागृहात आज चर्चा झाली. मंत्रिमंडळातील खात्याच्या मंत्र्यांनी आगामी वर्षभरातील उपक्रमांचे नियोजन या वेळी मांडले. राज्यभरातील तरुणाईपर्यंत उपक्रमांचा लाभ पोचविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गिरणारे येथील जी. पी. फार्म येथे काल (ता. 16) पासून "यिन'च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरवात झाली होती. आज विविध तज्ज्ञांनी "यिन'च्या सदस्यांशी संवाद साधला. सोशल मीडिया जगण्याचे माध्यम बनले असून, अनेक घटकांवर परिणामकारक ठरते आहे. सामाजिक प्रश्‍न सोडवण्यासाठी समजाच्या भल्यासाठी तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन "सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी केले. "यिन'च्या उपक्रमांद्वारे चारित्र्यसंपन्न पिढी घडत असल्याचे "एसएनबीटी'चे डॉ. प्रदीप नाईक म्हणाले. डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित बाली यांनी म्युच्युअल फंड, एसआयपी यासह बचतीसाठीच्या विविध माध्यमांचा तसेच संकल्पना सांगितल्या. राज्याच्या विकासासाठी जातीयवादाच्या प्रश्‍नावर तरुणाईने मार्ग काढावा, असे आवाहन चिंतन ग्रुपचे अध्यक्ष अभिनंदन थोरात यांनी केले.

या वेळी "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, "यिन'चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: nashik news yin minister management