यिनच्या समर युथ समीटचे दिमाखात उद्‌घाटन

अरुण मलाणी
रविवार, 28 मे 2017

जिल्हा परिषद अध्यक्षा सांगळे यांच्या हस्ते उद्‌घाटन, युवा वर्गात उत्साह

नाशिक : सुरेल संगीतातून वाढता उत्साह, मान्यवरांचे मार्गदर्शन अन्‌ त्यांच्या व्याख्यानातून मिळणारे ऊर्जा. अशा उल्हासमयी वातावरणात अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हब येथे डिलिव्हरींग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क 'यिन'च्या समर यूथ समीट 2017 ला सुरवात झाली. तरूणाईचे वैक्‍तिमत्व खुलविणाऱ्या या तीन दिवसीय उपक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या उपक्रमाविषयी तरूण-तरुणींमध्ये उत्साह बघायला मिळाला.

उद्‌घाटन कार्यक्रमास सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, स्पेक्रट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, यिनचे प्रमुख तेजस गुजराथी, सकाळचे युनीट व्यवस्थापक राजेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे नवीन काही तरी शिकायला मिळत असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये समाधान होते.

उद्‌घाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी श्रीमंत माने यांनी उपक्रम आयोजनामागील भुमिका विशद केली. यापूर्वी सकाळ मार्फत अधिकारी व्हायचंय मला यासह विद्यार्थ्यांच्या करीअरला दिशा देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यिनच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमातूनही विद्यार्थ्यांना जीवनाची नवी दिशा मिळू शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव चव्हाण व रश्‍मी सोरवणे यांनी केले.

मान्यवर म्हणाले...
शीतल सांगळे (अध्यक्षा, जिल्हा परीषद) : उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयीन कार्यकाळ अत्यंत महत्वाचा असतो. प्रामाणिकपणा, जिद्दीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रात यश मिळविता येऊ शकते. यिनच्या उपक्रमात सहभागी युवक-युवतींना मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा नक्‍कीच फायदा होईल.

रवींद्र सपकाळ (अध्यक्ष, सपकाळ नॉलेज हब) : काळ बदलला असून आपल्या क्षमतांच्या जोरावर विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता आहेत. करीअर घडविण्यासाठी भांडवलाची गरज राहिलेली नाही. केवळ आवश्‍यकता आहे ती विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविण्याची. या उपक्रमातून त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल.

सुनील पाटील (संचालक, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी) : केवळ अभ्यासक्रमात अव्वल येऊन करीअर घडू शकत नाही. तर उज्ज्वल करीअर घडवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कला-गुणांचा उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या क्षमता कशा ओळखाव्यात, याबद्दल युवकांना जाणीव करुन देणारा यिनचा हा कार्यक्रम आहे.

अपयशाच्या पुस्तकातील शेवटचे पान यश : बुर्घाटे
आपल्याला अपयश येईल या भितीने आपण यश मिळविण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्यातील चांगल्या गोष्टी बाहेर येऊ देत नाहीत. स्वत:चाच आवाज दाबून टाकतो. यश ही अपयशाची पहिली पायरी आहे, असे म्हटले जाते. पण एकापेक्षा अनेकदा अपयश येऊ शकते. ते पचविण्याची तयारी ठेवायला हवी. अपयशाच्या पुस्तकातील शेवटचे पान नक्‍कीच यशाचे असेल, असे प्रतिपादन मोटीव्हेशनल स्पिकर सचिन बुर्घाटे यांनी यावेळी केले. उद्‌घाटनानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना यश-अपयशाचे सूत्र उलघडून सांगितले. अपयशाशिवाय यशाला किंमत नाही. जितक्‍या वेळा अपयश येईल तितकेच यशाचे मुल्य वाढेल हे लक्षात ठेवायला हवे असे ते यावेळी म्हणाले.

Web Title: nashik news YIN Youth Inspirators Network Sakal Initiative