नाशिकमध्ये तरुण शेतकरी आघाडीवर

महेंद्र महाजन
बुधवार, 7 जून 2017

टाळे ठोकण्याच्या आंदोलनाने धरला जोर

टाळे ठोकण्याच्या आंदोलनाने धरला जोर
नाशिक - शेतकरी आंदोलनाची भूमी म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी संपाचा वारू स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. कुणाचेही नेतृत्व मान्य नसलेले शेतकरी आज सलग सहाव्या दिवशी रस्त्यावर उतरले. तलाठी, ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या आंदोलनाने जोर धरला आहे.

प्रशासनामध्ये चलबिचल वाढली असून, पोलिसांकडून आंदोलन दडपण्यासाठी पडलेल्या पावलांमुळे शेतकऱ्यांमधील रोष अधिक बळावला आहे. मुळातच, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्‍नांची, आंदोलनाची फारशी माहिती नसलेल्यांकडे संप हाताळण्याची धुरा सोपवण्यात आल्याने आंदोलनाची धग कायम राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्याचा फतवा काढण्यात आल्याच्या माहितीने सोशल मीडियातून धूम उठवली आहे.

साताळी (ता. येवला) येथे रस्त्यावर कांदे फेकत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा शेतकऱ्यांनी काढली. प्रतीकात्मक पुतळ्याला जोड्याने मारहाण करत दहन करण्यात आले. नैताळे (ता. निफाड) येथील तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. निफाड तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. नगरसूल (ता. येवला) येथील तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयाला शेतकऱ्यांनी कुलूप लावले. वाखारीमध्येही तलाठी कार्यालय बंद करण्यात आले आहे. पिंपळगाव जलाल टोक नाक्‍यावर समाजकंटक सापडत नाहीत, म्हणून अपयश झाकण्यासाठी शेतकऱ्यांवर दरोडा-हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप येवल्यामध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला. तसेच याच प्रश्‍नावर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: nashik news youth farmer involve in strike