स्वच्छतेचा मंत्र  प्रत्येकाने मनी रुजवावा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

आई, आजी व शहराच्या प्रथम नागरिक अशा विविधांगी भूमिकांमधून जाणाऱ्या महापौर भानसी यांनी राजकीय, सामाजिक जीवनातील प्रवास आणि भविष्यातील उपाययोजना मनमोकळ्यापणे मांडल्या. 

नाशिक... स्वच्छ, सुंदर, धार्मिक, पौराणिक शहर म्हणूनच देशभर परिचित आहे. पण, गलिच्छपणामुळे नाशिकची प्रतिमा मलीन होते की काय, अशी भीती आहे. वास्तविक, शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे; पण कुणालाही याबद्दल गांभीर्य नाही. मी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करते, ती माझी आवड आहे. तोच स्वच्छतेचा विचार मी शहरात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वच्छतेसाठी कुठलीही तडजोड मला अमान्य आहे, अशी भावना ‘कॉफी विथ सकाळ’च्या व्यासपीठावर महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त करीत स्वच्छतेचा मंत्र प्रत्येकाने मनी रुजवावा, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले आहे. नाशिकच्या सर्व प्रकल्पांसाठी त्यांची मदत होत आहे, असे नमूद करून एसटी चालविण्याबाबत आम्हाला कुठलेही पत्र प्राप्त नाही. तूर्त तरी एसटीचा ताबा ‘नको रे बाबा’ असेच म्हणावेसे वाटते.

गृहिणी ते महापौर... असा प्रवास
महापौर रंजना भानसी यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले ते वडील माजी खासदार (कै.) कचरूभाऊ राऊत यांच्याकडून. सन १९६२ मध्ये (कै.) राऊत दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती, कादवा सहकारी साखर कारखान्यावर संचालक, दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व व अखेरीस सन १९९५ मध्ये मालेगाव मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले होते. (कै.) राऊत यांच्या २० वर्षांच्या राजकीय यशाच्या कारकीर्दीत महापौर भानसी यांचा कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्ष सहभाग राहिला. ही बाब भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेतून सुटली नाही. सन १९९७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत म्हसरूळ भागातून भानसी यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ उमेदवारीच्या रूपाने पडली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपकडून उभे राहणे म्हणजे मोठे दिव्यच. पण, (कै.) बंडोपंत जोशी यांच्यासह पती पोपटराव भानसी, बंधू दिलीप राऊत, स्थानिक नागरिक सोपानराव कोकरे, आर. डी. कुलकर्णी, माधुरी कोंडे, हरीभाई पटेल, राजाभाऊ पटणी, उषा जैन, गौतम जगताप, रवी साळुंखे, रामचंद्र वडजे यांच्या आग्रहाखातर सौ. भानसी यांनी पहिली निवडणूक लढवली आणि निवडणुकीत ९०० मतांनी त्या निवडून आल्या. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत कोणीच थोपवू शकलेले नाही. सलग पाच वेळा निवडून आल्यानंतर यंदा योगायोगाने आदिवासी प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आणि शहराच्या प्रथम नागरिक होण्याचा मान त्यांना मिळाला. पती, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे व चार भाऊ असे कुटुंब सांभाळताना दुसरीकडे शहराच्या रोजच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे मोठे आव्हान त्या सहजतेने पेलत आहेत.

स्वच्छतेचा अजेंडा, अव्वल स्थान गाठण्याचा ध्यास
सकाळी उठून पाणी भरण्यापासून झाडलोट करण्यापर्यंतची कामे आजही महापौर भानसी करतात. घरातील कामे करताना त्यातून स्वच्छतेचा विचार अंगी बाणल्याचे त्या अभिमानाने सांगतात. जसे आपण घर स्वच्छ ठेवतो, तसे शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, हाच विचार शहरात रुजविण्यासाठी स्वच्छतेला महत्त्व दिल्याचे त्या अभिमानाने सांगतात. महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाशिककरांची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी स्वच्छतेसाठी कक्षाची स्थापना केली. फक्त गोदावरी स्वच्छतेसाठी ६५ स्वच्छता कर्मचारी व चार मुकादम नेमून गोदा स्वच्छतेचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला. सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या तक्रारींवर उपाय म्हणून संगणकीय पद्धतीने हजेरी सुरू केली. स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे; परंतु त्यावर लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडे कर्मचारी भरतीचा आकृतिबंध पाठविण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात मानधन किंवा आउटसोर्सिंगने कर्मचारी भरती केली जाईल. भाडेतत्त्वावर यांत्रिकी झाडूद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहरात प्रवेश करताना पर्यटकांना स्वच्छता दिसली पाहिजे, म्हणून प्रवेशद्वारावर रोजची स्वच्छता झालीच पाहिजे, असे आदेशित करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानात महापालिकेचे मानांकन घसरले असले, तरी पुढच्या टप्प्यात आणखी चांगले काम करून वरचा क्रमांक मिळवू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

‘एसटी’ चालविणे अशक्‍य
सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था राज्यातील काही महापालिकांनी चालवली, हे खरे असले तरी सध्या नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते शक्‍य नाही. महापालिकेने एसटी सेवा सुरू करावी, असे कुठलेही पत्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्राप्त झाले नसल्याचा खुलासा महापौर भानसी यांनी केला. महापालिकेने यापूर्वीच एसटी महामंडळाला त्यांच्यामार्फत सेवा सुरू ठेवण्यासाठी ना हरकत दाखला दिल्याचे त्यांनी नमूद केले. महापौर झाल्यावर प्रथम मागेल त्याला नळ देण्याची योजना जाहीर केली असली, तरी तेथपर्यंत पाणी पोचेलच, याची खात्री महापालिकेने दिली नसल्याचा खुलासा महापौर भानसी यांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर केला.

दत्तक विधान पावणारच
महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेण्याची केलेली घोषणा फलदायी ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शहराचा पुढील ५० वर्षांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी किकवी धरणाला निधी आणण्याकरिता प्रयत्न करणार आहे. शहरातील रिंगरोड व रिंगरोडच्या बाजूने मिनी ट्रेन सुरू करावी, याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल. शहरात पाण्याचे वितरण समप्रमाणात होण्यासाठी जलकुंभ उभारणे आवश्‍यक आहे. त्यासाठीही शासनाकडून निधी प्राप्त करून घेऊ. गेल्या पंचवार्षिकमध्ये ‘एलईडी’ खरेदीला मंजुरी देण्यात आली; परंतु अद्याप एलईडी दिवे बसले नाहीत. परिणामी, शहरातील अनेक भागांत अंधार निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा म्हणून आता महापालिकेतर्फे ३० कोटी रुपयांचा स्वनिधी खर्च करून एलईडी बसविले जातील. गंगापूर धरणावर केंद्र सरकारच्या अनुदानातून सोलर पॅनल बसविले जाणार आहेत. त्यातून जलउपसा केंद्रावर होणारा विजेचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले.

Web Title: nashik news,nashik mayor