फिलिपाईन्स, इंग्लंडमधून नाशिकच्या कांद्याला मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

'पाकिस्तानचा कांदा आपल्या कांद्याच्या तुलनेत क्विंटलला 200 रुपयांनी स्वस्त आहे. पण आपल्या कांद्याची चव चांगली असल्याने नवनवीन बाजारपेठांमधून मागणी सुरू झाली आहे. लंडनसाठी एक किलोच्या पॅकिंगमध्ये कांदा पाठवला जात आहे.''
- नितीन जैन (कांद्याचे व्यापारी)

स्थानिक भावात 200 रुपयांनी घसरण; चलन तुटवड्यामुळे लिलाव बंद
नाशिक - नाशिकच्या कांद्याला फिलिपाईन्ससह इंग्लंडमधून मागणी वाढली आहे. पण त्याच वेळी स्थानिक बाजारपेठांमध्ये नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या भावात क्विंटलला 200 रुपयांनी घसरण झाली आहे. याखेरीज नोटाबंदीनंतर झालेला चलनतुटवडा अद्याप कायम असून 450 ट्रॅक्‍टरभर कांदा येऊनही सटाणा बाजार समितीत लिलाव झाले नाहीत.

श्रीलंका, मलेशिया, दुबई, जर्मनी, इंडोनेशिया, सिंगापूर, ओमान, युनायटेड अरब अमिरात, इंग्लंड, इराक, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलियामध्ये कांद्याची निर्यात सुरू आहे. 26 नोव्हेंबरला एका दिवसामध्ये मुंबईहून 847 टन कांदा परदेशात रवाना झाला. एकीकडे निर्यात वाढत असली, तरीही स्थानिक बाजारपेठांमध्ये भावातील घसरण कायम आहे. रोख पैशांच्या प्रश्‍नामुळे शहरांमधील 30 टक्के हातगाडीवाल्याने कांद्याची विक्री थांबवली आहे. त्याच वेळी बाजारपेठेतील कांद्याची आवक वाढली. हे कारण भावातील घसरणीमागे असल्याचे कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी म्हणाले.

मनमाडमध्ये 8 हजार क्विंटल कांद्याची विक्री दिवसभरात झाली. त्यास क्विंटलला सरासरी 750 रुपये भाव मिळाला. लासलगावमध्ये 15 हजार क्विंटल कांद्याची सरासरी 800 रुपयांनी विक्री झाली. पिंपळगाव बसवंतमध्ये 19 हजार 500 क्विंटल कांदा विकला गेला. त्यास सरासरी 900 रुपयांपर्यंत भाव मिळाला. गेल्या आठवड्यापूर्वी क्विंटलभर कांद्याचा भाव एक हजार 50 ते अकराशे रुपयांपर्यंत पोचला होता. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, गुजरातमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे.

Web Title: nashik onion demand in philippines & england