PHOTO : तेरा जुगारी अड्ड्यावर खेळत होते मटका..अचानक झाली 'त्यांची' एंट्री

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना दिंडोरी नाका परिसरात राजरोसपणे मटका जुगार सुरू असल्याची खबर मिळाली होती. आयुक्तांनी अवैध धंदेविरोधी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. ११) दुपारी बाराच्या सुमारास दिंडोरी नाक्‍यावरील टॅक्‍सी स्टॅन्डच्या पाठीमागे असलेल्या पत्राच्या बंदिस्त खोलीत छापा टाकला.

नाशिक : पंचवटी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिंडोरी नाक्‍यावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून उद्‌ध्वस्त केला. अवैध धंदेविरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत १३ जुगाऱ्यांना अटक करत १९ हजारांची रोकड, ८२ हजारांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

आयुक्त नांगरे-पाटील यांना मिळाली मटका जुगार सुरू असल्याची खबर

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना दिंडोरी नाका परिसरात राजरोसपणे मटका जुगार सुरू असल्याची खबर मिळाली होती. आयुक्तांनी अवैध धंदेविरोधी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. ११) दुपारी बाराच्या सुमारास दिंडोरी नाक्‍यावरील टॅक्‍सी स्टॅन्डच्या पाठीमागे असलेल्या पत्राच्या बंदिस्त खोलीत छापा टाकला. त्यावेळी विलास गाडगीळ याच्या जुगार अड्ड्यात बाळू अहिरे (वय ३८, रा. पेठ फाटा, पंचवटी), नंदकुमार बिरारी (रा. माडसांगवी) हे दोघे कल्याण जुगाराचे आकडेमोड करीत होते. तर माणिक सानप (वय ४५, रा. साईनगर, हिरावाडी), जगतराव कश्‍यप (५३, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका), हिरामण खांदवे (५७, रा. संभाजी चौक, मेरी), किरण अहिरे (३५, रा. मु. पो. निगडोळ, ता. दिंडोरी), लक्ष्मण निंबळकार (४०, जाणोरी आंबे, ता. दिंडोरी), सदाशिव राऊत (४४, रा. बोरगड, म्हसरूळ), नवनाथ वाघ (३९, रा. मु. पो. दाताने, दिक्षी, ता. निफाड), योगेश अहिरे (४५, रा. हिरावाडी), पोपट वाघ (५१, रा. मु. पो. निळवंडी, ता. दिंडोरी), अशोक अहिरे (५६, वझरेश्‍वरी झोपडपट्टी, दिंडोरी रोड), वाल्मीक कांबळे (वय ५८, सीताराम भवन, पाथरवट लेन) हे जुगार खेळताना आढळले. संशयित जुगाऱ्यांकडून पोलिसांनी ८२ हजार ७८३ रुपयांचे जुगाराचे साहित्य व १९ हजार ७८० रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Image may contain: one or more people, people sitting and indoor

अवैध धंद्यांची माहिती कळवा 
नाशिक आयुक्तालय हद्दीत कोणत्याही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यासंदर्भातील माहिती नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्ष 0253-2305233 आणि 2305234 या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले. अशी माहिती देणाऱ्याची नाव गुप्त ठेवण्यात येईल. तरी नागरिकांनी अवैध धंद्यांबाबतची माहिती कळवावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Police arrested thirteen Gambling persons