नाशिकचे आठ प्रकल्प राष्ट्रीय इन्स्पायरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज स्प्रिंकर मशिन, एअर क्‍युरिफायर, वायरलेस पावर ट्रान्समिशन, मल्टिपर्पज अग्री मशिन हे प्रकल्प लक्षवेधी ठरले.

म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज स्प्रिंकर मशिन, एअर क्‍युरिफायर, वायरलेस पावर ट्रान्समिशन, मल्टिपर्पज अग्री मशिन हे प्रकल्प लक्षवेधी ठरले.

केंद्र शासन विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने भुजबळ नॉलेज सिटीत जिल्हास्तरीय आठवे इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शन होते. प्रदर्शनात ९९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ८९ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली होती. 
सांगलीत महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय, वाळवा येथे तीनदिवसीय राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शन झाले. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शालेय शिक्षक, तसेच जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी के. डी. मोरे यांनी परिश्रम घेतले.

रोबोटिक फायर फायटर
सटाणा तालुक्‍यातील बागलाण इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थिनी रिद्धी भामरे हिने लाकूड कॅमेरा, मोटार, एलईडी, पिचकारी, नळीच्या सहाय्याने रोबोटिक फायर फायटर बनविले आहे. त्यामुळे आग विझविता येते, तसेच जीवित व वित्त हानी टाळू शकतो. आग लागलेल्या ठिकाणची परिस्थिती बसल्या ठिकाणी बघू शकतो.

व्हेईकल थीप डिटेक्‍शन व नोटिफिकेशन
दिंडोरी तालुक्‍यातील मोहाडी येथील के. आर. टी. हायस्कूलची विद्यार्थी अनुष्का भाऊसाहेब गणोरे हिने वाढत्या वाहनचोरी घटना बघता जीएसएम व जीपीएस आधारित वाहनचोरी शोधयंत्र तयार केले आहे. त्यामुळे वाहनचोरीस आळा बसेल.

लेबर स्टॅन्ड
आंबेवाडी येथील सह्याद्री माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी विठ्ठल थवळे याने लेबर स्टॅन्ड तयार केला आहे. त्यामुळे मजुरांना फायदेशीर ठरते. शारीरिक श्रम कमी होतात. वैयक्तिक आरोग्य चांगले राहते. कामाची प्रत राहते.

मल्टिपर्पज स्पेडर कम स्प्रे
इगतपुरी तालुक्‍यातील न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयाचे विद्यार्थी प्रदीप लगड मल्टिपर्पज स्पेडर कम स्प्रे या उपकरणाच्या सहाय्याने शेतात सुखे खत समप्रमाणात पसरवू शकतो. कमी वेळेत अचूक काम होते. श्रमाची व वेळेची बचत होते. या उपकरणाच्या सहाय्याने द्रवरूपातील व स्थायूरूपातील दोन्ही खत फवारता येतात.

बहुउद्देशीय फवारणी यंत्र
आठणंबे येथील (कै.) डी. एन. देशमुख आश्रमशाळा येथील विद्यार्थी शिरीष पुंडलिक चव्हाण यांनी शेतीस उपयुक्त बहुउद्देशीय फवारणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र कमी खर्चात तयार करता येते. त्यामुळे पाठीचा त्रास होत नाही. कोणत्याही इंधनाशिवाय चालते. हाताळण्यास सोपे असून, कमी श्रमात जास्तीत जास्त काम करता येते.

एअर क्‍युरिफायर 
ज्या वेळी व्यक्ती व्यायाम करतो त्या वेळी उच्च श्‍वासाद्वारे कार्बन डायॉक्‍साइड वायू बाहेर जातो. ऐश्‍वर्या गुंजाळ मराठा हायस्कूल नाशिक येथील विद्यार्थिनीने एअर क्‍युरिफायर यंत्र तयार केले. या यंत्राद्वारे हवेत सोडलेला वायू त्यात शोषला जातो. व्यायाम करताना शुद्ध हवा मिळते व घरातही हवा शुद्ध होते.

पेसमेकर बॅटरी चार्जर
पेसमेकर हे हृदयरोग रुग्णाच्या शरीरात बसविले जाते. दर पाच ते सहा वर्षांनंतर ऑपरेशन करून पेसमेकर चार्ज करावे लागते. यासाठी खर्च होतो. नाशिक शहरातील स्वामिनारायण इंग्लिश स्कूलमधील कृषीता सोनवणे या विद्यार्थिनीने नवीन पेसमेकर तयार केले आहे. त्यामुळे विनाऑपरेशन चार्जे करता येते.

बहुउद्देशीय यंत्र 
सोनाई माध्यमिक विद्यालय, अंजनेरी येथील विद्यार्थी तेजस तुकाराम चव्हाण याने बहुउद्देशीय यंत्र तयार केले. या यंत्राच्या सहाय्याने पाण्याच्या पंपाच्या सहाय्याने द्रव सुशम अन्नद्रव्य फवारू  शकतो. फिरणाऱ्या पात्यांच्या केंद्रोत्सारी बलाच्या सहाय्याने घनरूप खते पसरवू शकतो. त्यामुळे शेतमजुरांचा आर्थिक भार कमी करता येऊ शकतो. तसेच पेट्रोल, डिझेलची बचत होते.

Web Title: Nashik Project Selection for National Inspire Award Exhibition