धडाड..धडाड... पिनाकचा क्षणात लक्ष्यवेध

धडाड..धडाड... पिनाकचा क्षणात लक्ष्यवेध

नाशिक - युद्धभूमीवर शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या तोफखाना केंद्राने आज प्रहार प्रदर्शनातून आपल्या क्षमतेचे दर्शन घडवत भारतीय तोफदल कोणतेही आव्हान स्वीकारण्यास सज्ज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. पारंपरिक तोफांबरोबरच बहुचर्चित बोफोर्स आणि सेन्सर प्रणालीवर आधारित महत्त्वाच्या आयुधांसह ‘मेक इन इंडिया’अंतर्गत विविध खासगी कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांना लष्कराच्या वापरात स्थान देण्याच्या नव्या धोरणाचीही झलक पाहायला मिळाली. 

नाशिक रोडच्या तोफखाना केंद्राच्या फायरिंग रेंजवर झालेल्या कार्यक्रमात १२० एमएम मोर्टास, १५५ सॉल्टन गन, वेगवेगळ्या प्रकारातील फील्ड गन, लहान व मध्यम पल्ल्याच्या तोफांसह कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरांसाठी कर्दनकाळ ठरलेली बहुचर्चित बोफोर्स आणि मल्टी बॅरेल रॉकेट लाँचरच्या विविध प्रकारच्या तोफांनी लक्ष्याचा अचूक वेध घेत भारतीय तोफखान्याच्या प्रहारक्षमतेचे दर्शन घडविले. आर्मी स्टाफचे डेप्युटी चीफ लेफ्टनंट जनरल सुब्राता सहा, (यूवायएसएम), तोफखाना केंद्राचे डायरेक्‍टर जनरल लेफ्टनंट जनरल पी. के. श्रीवास्तव यांच्यासह तोफखाना केंद्र, तसेच पुण्यातील वेलिंग्टन मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील उच्चस्तरीय लष्करी अधिकारी पुणे, नगर जिल्ह्यांतील लष्करी आस्थापनातील अधिकारी उपस्थित होते.

पिनाक आणि ब्राह्मोसचे दर्शन
तोफखाना केंद्राच्या वार्षिक प्रदर्शनादरम्यान सर्वाधिक लक्ष्य वेधले ते शत्रूच्या काळजाचा ठोका उडविणाऱ्या पिनाक आणि ब्राह्मोस यांच्या दर्शनाने. उपस्थितांसमोर ३० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा वेध घेत काही जेमतेम ४५ ते ५० सेकंदांत १२ रॉकेट डागणारे पिनाक पाहण्यासाठी उपलब्ध होते. तोफखान्याला अद्यावतीकरण आणि संहारक प्रहारक्षमतेमुळे परिपूर्णतेच्या दिशेने नेणारे ब्राह्मोसही सामील केले आहे. त्याचेही दर्शन या ठिकाणी घडविण्यात आले. पारंपरिक तोफांशिवाय वेगळ्या अद्ययावत तोफाही होत्या.

लक्ष्यभेदी बाँबचा थरार
इंडियन फील्ड गन १०५, १३० एमएम तसेच लहान पल्ल्याच्या हल्ल्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रॉकेट लाँचरच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचा श्‍वास रोखून धरला. एकाच ठिकाणाहून ३६० अंशांत गोलाकार फिरून लक्ष्याचा वेध घेणारी बोफोर्स तोफ, ७ ते ४० किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्य भेदण्यासाठी लौकिक असलेले रॉकेट लाँचर यांनी सहा बाँब डागून उपस्थितांच्या अंगावर रोमांच फुलविला. लहान, मध्यम व मोठ्या आकाराच्या विविध तोफांच्या मल्टिपर्पज रॉकेटचे प्रदर्शन यानिमित्ताने घडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com