Nashik Roads conditions are too bad
Nashik Roads conditions are too bad

नाशिक - दिंडोरीच्या पश्चिम भागातील रस्त्यांची वाट

लखमापूर (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, वाटसरु तसेच परिसरातील नागरिकांना चिखल-गाळातुन वाट काढावी लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आज बघावयास मिळत आहे. तालुक्यापासुन १२ ते १५ किमी. अंतरावरील ओझे, करंजवण, म्हेळुस्के, कादवा म्हाळुंगी आदि गावातील रस्त्यांना कोणी वाली नाही का? असा सवाल ग्रामस्थांकडुन उपस्थित केला जात आहे. या भागातील म्हेळुस्के-ओझे-करंजवण-खेडले हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजुर झाला आहे. या रस्त्यांसाठी सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असताना, फक्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या असमन्वयामुळे या रस्त्याचे काम अद्याप पर्यंत सुरु झाले नाही. 

ओझे ते करंजवण या दोन किमी रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे. रस्त्यावर चिखलच आहे. सुमारे ८ ते १० वर्षापुर्वी या रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात आले होते, परंतु नित्क्रुष्ट दर्जाच्या कामामुळे तो रस्ता पुर्णपणे उखडला असल्याने त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणुन मुरुम टाकण्यात आला होता, परिणामी पावसाने त्या मुरुमाचा गाळ तयार झाल्याने या रस्त्यावरुन ये- जा करणे जिकिरीचे झाले आहे. त्याचप्रमाणे ओझे ते कादवा म्हाळुंगी या रस्त्याची अवस्था बहुतांशी बिकटच असुन या रस्त्यावरुन वाहन धारकांना वाहन चालविणे अवघड होवुन बसले आहे. 

या रस्त्याने दररोज सुमोरे १५० ते २०० विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जात-येत असतात, तसेच चाकरमाने, शेतकरी हे तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करत असल्याने हा रस्ता तालुक्याला जोडला जाणारा असल्याने या रस्त्यावरुन दुध टँकर, मालवाहतुक करणारे ट्रक, बसेस, अवजड वाहनांची वर्दळ कायमच असते, त्यामुळे गाड्या फसणे, छोटे-मोठे अपघात, दुचाकीधारकांची कुचंबना हि नित्याचीच बाब झाली आहे. शेतकर्यांना दिंडोरी, नाशिक, वणी, गुजरातला जाण्या- येण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो परंतु सदर रस्ता हा पुर्णपणे खराब झाला असल्याने यावरुन वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची गावातील नागरिकांनी अनेकदा मुरुम माती टाकुन स्वत: झटुन श्रमदानातुन डागडुजी केली होती. परंतु, पावसाने त्याची पुर्णत: वाट लागल्याने ग्रामस्थांनीच किती वेळा रस्ता करायचा? प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काही कामे करणार की नाही असा सवाल नागरिक करत आहे. सिग्राम कंपनी, कादवा म्हाळुगी, म्हेळुस्के हा तीन ते चार कि.मी.चा रस्त्यासाठी निधी मंजुर नसुन, त्याबाबातही योग्य पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

"प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव"
दिंडोरी तालुक्यातील पूर्व भाग तसा सुजलाम सुफलाम असला तरी तत्कालीन प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या भागांचा पाहिजे तितका विकास अद्याप पर्यंत होवु शकला नाही. रस्ते, वीज, पाणी या मुलभुत गरजा व सुविधा अजुनही पुर्णपणे नागरिकांना उपसब्ध नाही. तसेच 'म्हेळुस्के- ओझे- करंजवण- खेडले' या रस्त्यांसाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजुर होवुनही केवळ प्रशासनाची दिरंगाई व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे पावसाळ्यात नागरिकांना कष्ट सोसावे लागत आहे. सरकार अनेक योजना लागु करते, परंतु प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा लाभ मिळत नसल्याची वास्तविकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com