प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

ज्या गाड्यांमधून धूर निघतो अशा वाहनांचीच तपासणी केली जाईल. सर्वसामान्यांना या मोहिमेतून त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच कारवाईचे स्वरूपदेखील मोटार वाहन अधिनियमांतर्गत येणाऱ्या तरतुदींनुसारच असेल. 
- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

नाशिक : दिल्लीसह अन्य शहरांमध्ये वायुप्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनलेला असताना नाशिक शहरातही प्रदूषणावर आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मोहीम राबविली जाणार आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरटीओ कार्यालयातर्फे मोहीम राबविली जाईल. दोषी आढळलेल्या वाहनांना जागेवर दंड न करता नियमानुसार वैध पीयूसी सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतरही सादर न करणाऱ्या वाहनमालकांना दंड केला जाईल. 

वाहनाच्या धुरातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. अनेक विषारी वायूमुळे सामाजिक आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. देशभरात वायुप्रदूषण हा चर्चेचा विषय असताना नाशिकमध्येही प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे या विषयावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. वाहन तपासणी मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाईल. संबंधित वाहनचालकांकडे वैध पीयूसीची तपासणी केली जाईल. 

असे असेल कारवाईचे स्वरूप 
पीयूसी नसलेल्या वाहनचालकांना सादरीकरणासाठी सात दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत वाहनचालकाने वैध पीयूसी सादर केली, तर कुठल्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. वैध प्रमाणपत्र सात दिवसांच्या आत वाहनमालकाने प्राप्त केले, परंतु आरटीओ कार्यालयात सादर केले नाही, अशा प्रकरणात दोनशे रुपये तडजोड शुल्क आकारले जाईल. सात दिवसांच्या कालावधीत वैध पीयूसी न मिळवू शकणाऱ्यांना मोटर वाहन अधिनियम, 1988 अन्वयेअंतर्गत वाहनमालक व चालक या दोघांनाही प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला जाईल.

Web Title: Nashik RTO to act against air pollution