नाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण

दिगंबर पाटोळे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स, गॅरेजवाल्याचा मोल' वाढत असून वाहनधारकांची अावस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखी झाली आहे.

वणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स, गॅरेजवाल्याचा मोल' वाढत असून वाहनधारकांची अावस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखी झाली आहे.

नाशिक - वणी या राज्यमार्ग क्रमांक १७ या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने बीओटी तत्वावर खाजगीकरणातून रस्त्याचे ७ मीटर रूंदीकरण करण्यात आले होते. सदर रस्त्यावर ढकांबे येथे २००६ पासून टोल वसुली सुरु होती. टोल सुरु असतांनाही रस्तावर काही ठिकाणी कायम खड्डे पडत असत, मात्र टोलवसुली करणारी कंपनी यावर लागलीच उपाययोजना करीत होती. दरम्यान राज्य सरकारने १ जुन २०१५ पासून या रस्त्यावरील टोलवसुली बंद केल्याने दिंडोरीसह कळवण, सुरगाणा तालुक्यातील वाहनधारकांकडून होणारी टोललुट थांबली. तसेच सप्तश्रृंगी गड, सापूतारा येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांसह गुजरात राज्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला. तदनंतर सदर रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभालीसाठी आला आणि पुन्हा रस्त्याचे आरोग्य बिघडू लागले.

टोलनाका बंद झाल्यानंतर एकाच वर्षातच रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. तद्पासून वर्षातून एकदा तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाला आहे. गेल्या दोन महिन्याॆपासून रस्त्यावरील खड्यांची दिवसागणिक संख्या, आकार, खोली वाढत असून सार्वजनिक बांधकाम विभाग तालुक्यात कार्यरत आहे की नाही , अशी विचारणा वाहनधारकांकडून होवू लागली आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे चुकवतांना रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असून वाहनांमधील लहान बालके, वृध्दनागरीक, दिव्यांग, महिला वर्गांना खड्डयांच्या दणक्यांमुळे पाठ, मानेचे व्याधी जडली जाऊ लागली आहे. 

श्रावण महिन्यात सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मोठी वर्दळ तसेच सापूतारा येथे मान्सुन उत्सवासाठी पर्यटकांच्या वाहनांची या रस्त्यावर वाढती वर्दळ सुरु आहे. त्यात रस्त्यावरील मोठमोठे खड्डे चुकवतांना वाहनचालकांना चांगलीच कसब करावी लागत असून रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असून वाहानांचेही नादुरुस्तीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावर प्रवास करतांना शारीरीक, मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक झळही सोसावी लागत  आहे. वाहनधारक रस्त्याचे काम बघणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराचे नाव व मोबाईल नंबर सोशल मिडीयाद्वारे मागु लागत असून या मार्गावरुन जिल्हा बाहेरील तसेच गुजरात राज्यातील प्रवासी या भागातील लोकप्रतिनिधी कोण याबाबत विचारणा करीत आहे. काहींनीतर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेले फायदेही गांधीगीरीच्या भाषेत सोशल मिडीयावरुन सर्वत्र फिरु लागले आहे. एकीकडे लोकप्रतिनिधी नाशिक - वणी रस्त्यावरील वाहतूकीचा वाढता ताण, वाढती अपघात संख्या, वाहतूकीची होणारी कोंडी लक्षात घेवून रस्ता चौपदरी करणार असून त्यास मंजुरी मिळाल्याची घोषना करण्यात आली आहे. मात्र रस्त्याचे रुंदीकरणाचे काम होईल तेव्हा होईल, मात्र आहे तो रस्ता सुस्थितीत व्हावा ही अपेक्षा तालुकावासीय व्यक्त करीत आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या खड्ड्यां विषयीच्या पोस्ट -
खड्डयाच्या नावाने नागरिक विनाकारण ओरड करत आहेत. खड्डयामुळे शहरात किती तरी उद्योगधंदे भरभराटीस आले आहेत आणि इतर ही फायदे आहेत त्याचा विचार करा.

1 ) खड्डयामुळे मानेचे बेल्ट , पाठीचे बेल्ट , कमरेचे बेल्ट , आयोडेक्स , झंडू बाम , व इतर वेदनाशामक औषधीची विक्री वाढली . आर्थोपेडिक्स डॉ कड़े प्लास्टर साठी रांग लागु लागली .
2 ) गाड्यांचे स्पेअर पार्ट्स , रस्तोरस्ती गॅरेजच्या लोकांना रोजगार वाढला 
3 )खड्डयामुळे लोकांचा राहदारीचा वेग कमी झाला , पर्यायाने घाई गड़बड़ न करता सावकाश काळजीपूर्वक चालायची सवय लागली . मन एकाग्र करण्यासाठी योगा करण्याची आवश्यकता नाही राहिली . फक्त खड्डयाचा विचार केला की मन अगदी एकाग्र होते .
4 ) दररोज ऑफिस ला जाणा-यांना आजार पणाच्या सुट्यांमुळे का होईना कुटुंबा बरोबर वेळ घालवता येऊ लागला .
5 ) सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जवळपास जाण्यासाठी माणूस गाड़ी न वापरता पायीच चालू लागला , त्यामुळे चालण्याचा व्यायाम तर होतोच पण ..... देशाच्या प्रगतीला आवश्यक असणारे इंधन बचत होऊ लागली .
6) आणि खड्डे कुठे नाहीत .......खड्डे तर चंद्रावर सुद्धा आहेत ... आणि प्रत्येक माणसाचे स्वप्न असते चंद्रावर जाण्याचे त्या साठी अगोदर सराव आवश्यक असतो ..... तेंव्हा आपला सराव चालू ठेवा उगाचच सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिकेला, महानगरपालिका ला दोष देऊ नका .....

Web Title: nashik wani state high way in bad condition