संतप्त महिलांचा पाण्यासाठी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

येवला (नाशिक) : सायगाव येथील महादेव वाडीच्या संतप्त महिलांनी आज (शनिवार) सकाळी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेत तहासिलदारांनाच जाब विचारला. पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून तहानलेल्या महादेववाडीतील महिलांनी आक्रोश करीत प्रथम सायगाव येथे ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा नेला होता.

येवला (नाशिक) : सायगाव येथील महादेव वाडीच्या संतप्त महिलांनी आज (शनिवार) सकाळी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेत तहासिलदारांनाच जाब विचारला. पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून तहानलेल्या महादेववाडीतील महिलांनी आक्रोश करीत प्रथम सायगाव येथे ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा नेला होता.

सुमारे ४०० लोकसंख्या असलेल्या महादेव वाडीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून गावात असलेल्या एका हातपंपाला पाणी नसल्याने येथील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी महादेववाडीला स्वखर्चातून पाणी टँकर दिल्यानंतर शनिवारी महिलांनी सकाळी ९.३० वाजता सायगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा नेला. सायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मीनाताई खुरासने ह्या महादेववाडीतील असल्याने खुरासने यांनीच मोर्चाचे नेतृत्व केले. पंचायत समितीचे माजी उपसभापती दगु आव्हाड, सुनील आव्हाड, संजय माळी, विश्वनाथ सोनवणे यांच्यासह इंदू आव्हाड, उजबाई मोरे, वाळूबाई मोरे, साखरबाई माळी, ठकूबाई माळी, संगीता सोनवणे, संगीता आव्हाड, सुमन आव्हाड, परिघा पवार, लता सोनवणे, आशा खुरासने, विमालबाई माळी, ताई कांबळे, जनाबाई माळी, सोनाली आव्हाड लहानुबाई सोनवणे, तुळसाबाई मोरे, इंदूबाई खुरासने आदींसह १०० महिला हंडा घेऊन मोर्चात सामील झाले होते.

ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य सुनील देशमुख, दिनेश खैरनार यांना संतप्त महिलांनी जाब विचारल्यानंतर या दोघा सदस्यांनी ग्रामपंचायतीने पंचायत समितीच्या पाणी टँकर संदर्भात पाठविलेले प्रस्ताव महिलांना दाखविले.यानंतर हे सदस्य संतप्त महिलांना घेऊन येवला येथे तहसील कार्यालयात आले .महिलांनी हंडे घेऊन संपूर्ण तहसील कार्यालयालाच घोषणा देत फेरी मारली. 'पाणी द्या, पाणी द्या 'महादेव वाडीला पाणी टँकर मिळालाच पाहिजे', पाणी टँकर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा ' अशा घोषणा संतप्त महिलांनी यावेळी दिल्या.

तहसीलदारांच्या दालनाबाहेर महिलांनी  पाण्याच्या टँकरसाठी सकाळी सव्वा दहा वाजेपासून ठिय्या मांडला. ११ वाजता तहसीलदार नरेशकुमार बहिरम हे आपल्या दालनात आल्यानंतर संतप्त महिला तहसीलदारांच्या दालनात घुसत जाब विचारला .तहसीलदारांनीही दोनच दिवसांपूर्वी महादेववाडीची पाहणी केली असून ग्रामपंचायतीने आपणाला २० फेब्रुवारी रोजी पहिला तर १ मार्च रोजी दुसरा पाणी टँकरसाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले . सोमवार पावेतो महादेववाडीला पाणी टँकर सुरू करू असे आश्वासन दिले. यानंतर संतप्त महिलांचे समाधान झाले. यावेळी ग्रामसेवक प्रदीप बोडखे, सोमनाथ सोनवणे, भाऊलाल कांबळे, विजय कांबळे, महेश सोनवने, गोरख पवार, अनिल सोनवणे, अरुण माळी मयूर आव्हाड, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: nashik yeola Handa Morcha on the Tahsil office for womens water