मराठमोळे पदार्थ आता "रेडी टू इट' 

मराठमोळे पदार्थ आता "रेडी टू इट' 

नाशिक - अस्सल मराठमोळ्या पदार्थांची आवड असलेल्या खवय्यांसाठी नाशिकचा युवा व्यावसायिक केतन बधान याने विविध उत्पादने विकसित केली आहेत. शाश्‍वत पदार्थांचा वापर करून कच्च्या घाण्याच्या तेलापासून केतनने "रेडी टू इट, रेडी टू कुक' असे मराठमोळे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. चांगला स्थिरस्थावर कौटुंबिक व्यवसाय असताना त्याने वेगळे करून दाखविण्याच्या जिद्दीतून या उत्पादनांची निर्मिती केली. त्यास देश-विदेशांतही चांगली मागणी आहे. "पाइव्ह मिनीट मिल' या नावाने तो लवकरच बाजारात उत्पादने आणणार आहे. 

दहावीनंतर पदविका शिक्षण घेत असताना आलेल्या अपयशातून केतनने वाणिज्य शाखेतून पदवीचा पर्याय निवडला. पदविका पूर्ण करताना बी.कॉमचे पदवी शिक्षणही पूर्ण केले. सोबतच "एमबीए' अभ्यासक्रमही यशस्वीरीत्या पूर्ण केला. वडील जयवंत बधान 1984 पासून व्यवसायात आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या खाद्यपदार्थांची वितरणव्यवस्था त्यांच्यामार्फत चालत होती. केतनलाही व्यवसायात रस असल्याने त्याने काही काळ कौटुंबिक व्यवसाय सांभाळला. इतरांनी उत्पादित केलेली उत्पादने विक्री करत दमछाक करण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या उत्पादनाचे वितरण का करू नये, या विचारातून त्याने उत्पादन व्यवसायात उतरण्याची तयारी केली. प्रारंभी कुटुंबीयांनी विरोध केला. मात्र, घरच्यांचा विरोध पत्करत त्याने 2014 पासून उत्पादन बनविण्यासंदर्भात संशोधन सुरू केले. "केटेन-राज इनोव्हेटिव्ह फूड्‌स प्रा. लि'च्या माध्यमातून दोन वर्षांपासून प्रत्यक्ष उत्पादन घाऊक पद्धतीने उपलब्ध करून दिले आहे. "पाइव्ह मिनीट मिल' हा ब्रॅंड लवकरच तो अवगत करणार असून, 2030पर्यंत एक कोटी किचनपर्यंत पोचण्याचे ध्येय त्याने ठेवले आहे. 

अस्सल मराठमोठे पदार्थ 
खानदेशी पुरण, नाशिकची मिसळ इथपासून; तर कोल्हापुरी ग्रेव्ही, खानदेशी ग्रेव्ही, ड्रायफ्रूट पिठलं, जैन मिसळ, जैन पावभाजी, सांबर, पारंपरिक ग्रेव्ही असे विविध पदार्थ "रेडी टू इट' स्वरूपात तयार केले आहेत. "आई आणि आजीच्या हाताची चव कधीही, कुठेही' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या या पदार्थांना परदेशातही चांगली मागणी आहे. 

दिव्यांगांना रोजगार 
सध्या उत्पादन प्रक्रिया पुण्यात सुरू असून, लवकरच ओझर येथील जागेत नवीन कारखाना सुरू केला जाणार आहे. व्यवसायाचा विस्तार करताना आगामी काळात दोन हजार दिव्यांगांना रोजगार देण्याचे ध्येय असल्याचे केतनने सांगितले. उत्पादन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी शेतकऱ्यांशी करार करत त्यांच्या मालालाही चांगला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com