जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आधी पंचायत समिती सभापतींची निवडणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नाशिक - जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापतींची निवड 14 मार्चला होणार आहे; तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड 21 मार्चला होणार असल्याचे आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे 21 मार्चला राबविल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेपूर्वीच 15 तालुक्‍यांमधील पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या राजकीय जुळणीतून आगामी लढतीची चुणूक पाहावयास मिळणार आहे. 

नाशिक - जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापतींची निवड 14 मार्चला होणार आहे; तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड 21 मार्चला होणार असल्याचे आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे 21 मार्चला राबविल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेपूर्वीच 15 तालुक्‍यांमधील पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या राजकीय जुळणीतून आगामी लढतीची चुणूक पाहावयास मिळणार आहे. 

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांपैकी सिन्नर, येवला, निफाड, नांदगाव, पेठ, इगतपुरी या सहा ठिकाणी शिवसेनेने एकहाती सत्ता मिळविली आहे. नाशिक, कळवण या दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. बागलाण पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे, तर सुरगाण्यात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बहुमत आहे. उर्वरित दिंडोरी, देवळा, त्र्यंबकेश्‍वर, चांदवड, मालेगाव या पाच ठिकाणी कुणाही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने तेथे अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षांशी हातमिळवणी करावी लागणार आहे. यामुळे पाच पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षांना एकमेकांशी आघाडी करावी लागणार आहे. दिंडोरीत शिवसेना व "राष्ट्रवादी'चे प्रत्येकी चार सदस्य असून, कॉंग्रेस तीन व एक अपक्ष असे बलाबल आहे. येथे कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'ची आघाडी झाल्यास त्यांना सहज सत्ता स्थापन करणे शक्‍य होणार आहे. देवळ्यात "राष्ट्रवादी'चे तीन, भाजपचे दोन व शिवसेनेचे एक असे बलाबल आहे. तेथे शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चांदवडमध्ये भाजपचे 3, शिवसेनेचे दोन, "राष्ट्रवादी'चे दोन व कॉंग्रेसचे एक असे बलाबल आहे. येथे शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे शक्‍य नाही. मात्र, या दोन पक्षांमधील विकोपाला गेलेला वाद पाहता मुंबईच्या महापौरपद निवडणुकीनंतरच चित्र स्पष्ट होईल. मालेगावमध्ये शिवसेना व भाजपकडे समान सहा सदस्य असून, एक अपक्ष व एक "राष्ट्रवादी'कडे आहे. त्र्यंबकेश्‍वरमध्ये माकपकडे दोन सदस्य असून, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्षांकडे प्रत्येकी एक सदस्य आहे. 

पक्षनिहाय बहुमत असलेल्या पंचायत समिती 
शिवसेना : सिन्नर, येवला, इगतपुरी, निफाड, पेठ, नांदगाव 
राष्ट्रवादी : नाशिक, कळवण 
माकप : सुरगाणा 
भाजप : बागलाण 

येथे होणार तडजोडी 
दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर, चांदवड, देवळा, मालेगाव 

Web Title: nashik zp panchayat samiti