
Nashik News : कळवणला 100 खाटांचे रुग्णालय; डॉ. भारती पवार यांच्या हस्ते लोकार्पण
Nashik News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आदिवासी बहुल भागासह इतर ठिकाणच्याही रुग्णांचे उपचारासाठी हाल झाले होते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कळवणला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १०० खाटांचे अद्ययावत वातानुकूलित सुसज्ज रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी उभे राहिले आहे.
या सेवेचा रुग्णांना फायदा होणार आहे. यापुढेही सर्वसामान्यांच्या आरोग्यसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. (100 bedded hospital opened in Kalwan nashik news)
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात १०० खाटांचे वातानुकूलित रुग्णालयाची उभारणी नुकतीच करण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या लोकार्पण समारंभात डॉ. पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शासकीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात होते.
त्या पुढे म्हणाल्या, कळवण तालुक्यात कोरोनाकाळात आदिवासी बहुल भागातील सर्वसामान्य नागरिकांचे उपचाराअभावी हाल झाले, ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कळवण तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून ६ कोटींचा निधी मंजूर करून घेतला.
या निधीतून वातानुकूलित १०० खाटांचे अद्ययावत अशा फिल्ड हॉस्पिटलचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे. उपस्थितांना ‘मोदी है, तो मुमकिन है’ च्या घोषणा दिल्या. यापूर्वीच या ठिकाणी ऑक्सिजन प्लॉटही उभारण्यात आला आहे.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वासीम शेख, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. अनंत पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पगार, महामंत्री नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, महिला अध्यक्ष सोनाली जाधव, विधानसभा अध्यक्ष रमेश थोरात, शहराध्यक्ष निंबा पगार, विकास देशमुख, सुनील पवार, डॉ. अनिल महाजन, सतीश पगार, हितेंद्र पगार, एस के पगार, संदीप अमृतकार, राजेंद्र ठाकरे, गोविंद कोठावदे, कुष्णकुमार कांबळसकर, दीपक वेढणे, हेमंत रावले, चेतन निकम, काशिनाथ गुंजाळ, मोतीराम वाघ, दादा मोरे, दिनकर आहेर, प्रकाश कडवे, मोहन चौधरी, भूषण देशमुख, गौरव पाटील, सुनील खैरनार, प्रभाकर निकम, बबन वाघ, मनोहर बोरसे, संदीप पगार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांगली सेवा द्यावी ही अपेक्षा
कळवणला आता कुठच्याही आरोग्य सुविधांची कमतरता नाही. एकाच छताखाली गरीब, श्रीमंत हा भेदभाव न राहता सर्वांना येथील आधुनिक आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे. फक्त येथील स्टाफने रुग्णांना चांगली सेवा द्यावी, कोणतीही तक्रार येता कामा नये हीच अपेक्षा आहे. हलगर्जी करणाऱ्यांवर प्रसंगी कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मंत्री डॉ. पवार यांनी दिला.