
NEET Exam : ‘नीट’ परीक्षेला 12 हजार विद्यार्थी जाणार सामोरे; 20 केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा
NEET Exam : वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्लीटी कम एंट्रान्स टेस्ट (नीट) २०२३ परीक्षा रविवारी (ता. ७) नियोजित आहे. नाशिकमध्ये वीस केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.
सुमारे बारा हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार असून, तयारी अंतिम टप्यांत आलेली असल्याची माहिती मिळते आहे. (12 thousand students will face NEET exam Offline Exam at 20 Centers nashik news)
एमबीबीएस, बीडीएस, फिजिओथेरपी यासह अन्य सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेशासाठी नीट २०२३ या परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. ‘एम्स’ मध्ये याच परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता येत्या रविवारी (ता.७) दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून २० मिनीटे या कालावधीत ‘नीट २०२३’ ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, यासंदर्भातील सूचना वेळोवेळी जारी केलेल्या आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती देणारे सूचनापत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जारी केलेले आहे. नाशिकमध्ये वीस परीक्षा केंद्रांवर सुमारे बारा हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची प्रतीक्षा कायम होती. विद्यार्थ्यांच्या एका समूहातर्फे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी समाज माध्यमांतून केली जात होती.