Water Crisis : 10 महिन्यांत 1220 पाणी नमुने दूषित! कोट्यवधी खर्चूनही अशुद्ध पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

contaminated water

Water Crisis : 10 महिन्यांत 1220 पाणी नमुने दूषित! कोट्यवधी खर्चूनही अशुद्ध पाणीपुरवठा

विकास गामणे सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी शंभर टक्के गावांत शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग तसेच भूजल सर्वेक्षण विभागाने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत एकूण २३ हजार ३५५ पाणी नमुने तपासले असून, यातील एक हजार २२० (पाच टक्के) पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

या दहा महिन्यांतील नमुने तपासणीत सर्वाधिक दूषित नमुने सिन्नर, त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांतील असून, हे तालुके दूषित नमुन्यात आघाडीवर आहेत. (1220 water samples contaminated in 10 months Impure water supply even at cost of crores nashik news)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस शासनाने पाणीगुणवत्ता तपासणी किटचे (फिल्ड टेस्ट किट) वाटप केले असून, जिल्ह्यातील एक हजार ३८४ ग्रामपंचायतींना हे किटचे वाटप झाले आहे.

या किटद्वारे गावपातळीवर २४ ते ४८ तासांत पाण्याच्या गुणवत्तेचे परिक्षण करण्यात येते. मात्र, प्रत्येक वेळच्या तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून येत आहे. तपासणीनंतर संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत सूचना दिल्या जातात. तरीदेखील जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही.

आरोग्य विभागांतर्गत आरोग्यसेवक जलसुरक्षारक्षकांच्या मदतीने वर्षभर प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने घेत असतात. यात पाणी नमुने तपासणीत सिन्नर, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये सतत दूषित नमुने आढळत असल्याने दूषित नमुने तपासणीत हे तालुके आघाडीवर आहेत.

एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत सिन्नर तालुक्यात एकूण एक हजार ४३८ पाणी नमुने तपासणीस आले, पैकी १७८ (१२ टक्के) पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण दोन हजार १६७ पाणी नमुने तपासणीस आले, यापैकी २५४ (१२ टक्के) पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

पेठ तालुक्यात एकूण एक हजार २९५ पाणी नमुने तपासणीस आले असून, यातील १३७ (११ टक्के) पाणी नमुने दूषित आढळले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नियमितपणे तपासणी, पण

पाणी नमुन्यांची तपासणी करण्याचे काम आता भूजल सर्वेक्षण विभागाकडे देण्यात आले आहे. या विभागाकडून नियमितपणे पाणी तपासणी केली जात आहे. तपासणीचे अहवाल आरोग्य विभागास पाठवले जातात.

पाण्याचे नमुने तपासणीसाठी ग्रामपंचायतींकडून भूजल विभागाकडे पाठवले जातात. या आधी आरोग्य विभागाकडून कार्यवाही केली जात होती. असे असले तरी काही ग्रामपंचायतींना हे किट मिळाले नसल्याचे व याबाबत काहीच माहिती नसल्याचेही समोर आले आहे.

सिन्नर तालुक्यात ही स्थिती असून, अशी काही तपासणी होते, हेच माहिती नसल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे ही तपासणी किती गावात होते, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. दूषित पाण्याचा प्रश्न दैनंदिन शुद्धीकरणाचा अभाव, निष्कृष्ट दर्जाची टीसीएल पावडर वापरणे, टीसीएल योग्य पद्धतीने न हाताळणे यामुळे वाढत असल्याचेही समोर आले आहे.

दहा महिन्यांत तालुकानिहाय घेतलेले नमुने आणि दूषित नमुने

तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने टक्केवारी

सिन्नर १४३८ १७८ १२

त्र्यंबकेश्वर २१६७ २५४ १२

पेठ १२९५ १३७ ११

दिंडोरी १८२८ १५४ ८

सुरगाणा २२९६ १५५ ७

मालेगाव १४७२ ५७ ४

बागलाण १६५५ ६१ ४

चांदवड १३६७ ४३ ३

नांदगाव १२५६ ३९ ३

देवळा १२०७ २७ २

इगतपुरी १३९९ ३१ २

कळवण १८७८ ३७ २

नाशिक ९९८ १८ २

निफाड १९१४ १९ १

येवला ११८५ १० १

---------------------

एकूण २३, ३५५ १२२०