जिल्ह्यातील 169 ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hagandari free village

जिल्ह्यातील 169 ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा

नाशिक : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेल्या व हागणदारीमुक्त अधिक गावाबाबतचे निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील १६९ ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त अधिकचा दर्जा प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक गावांना हा दर्जा मिळाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या गावांचे अभिनंदन करत आदर्श गावाकडे वाटचाल करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. (169 Gram Panchayats in district have been given status of Hagandari mukt Nashik latest marathi news)

केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात गाव हागणदारीमुक्त करण्यावर भर देण्यात आला होता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

यामध्ये वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. प्रत्येक गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे बांधकाम यांसारखी कामे करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर संबंधित गावाला ओडीएफ प्लस मानांकनाचा दर्जा प्रदान करण्याकरिता विविध निकषांची पूर्तता करून गावे टप्प्या टप्प्याने हागणदारीमुक्त अधिक घोषित करायची आहेत.

हागणदारीमुक्त अधिक गावांचे तीन प्रकार असून, उदयमान, उज्ज्वल व उत्कृष्ट या प्रकारात गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून जाहीर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हागणदारीमुक्त अधिक घोषित केलेल्या १६९ गावांपैकी १६१ गावांनी उत्कृष्ट गावाचा दर्जा प्राप्त केला आहे. जिल्ह्यात या वर्षी ७१० गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात येत असून, गावांचे आराखडे तयार करणे, प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची कामे करण्यात येत आहेत.

हेही वाचा: Nashik : ATM फोडण्याचा पांगरी येथे प्रयत्न

पावसाळ्यानंतर सर्व गावांमध्ये काम सुरू होणार आहे. संबंधित गावदेखील मार्च २०२३ पर्यंत हागणदारीमुक्त अधिक करण्याचे नियोजन असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा पडोळ यांनी दिली.

हागणदारीमुक्त अधिक गाव करण्यासाठी गटविकास अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सल्लागार, तालुका स्तरावरील गटसमन्वयक, समूह समन्वयक, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत कंत्राटी अभियंते यांनी परिश्रम घेतले.

तालुकानिहाय हागणदारीमुक्त अधिक गाव

बागलाण - २३
चांदवड - सहा
देवळा - एक
दिंडोरी - पाच
इगतपुरी - सात
कळवण - १२
मालेगाव - तीन
नांदगाव - आठ
नाशिक - १४
निफाड - १२
पेठ - २०
सिन्नर - चार
सुरगाणा - ३८
त्र्यंबकेश्वर - १२
येवला - चार

हेही वाचा: खासगी संभाषणात संयम गमावू नका; Social Mediaवरील ‘व्यवहार’ होतोय रेकॉर्ड