Nashik Crime News : तृतीयपंथीयांकडून हप्ते घेणाऱ्या दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik Crime News : तृतीयपंथीयांकडून हप्ते घेणाऱ्या दोघांना अटक

इगतपुरी शहर : रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमध्ये भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथीयांना शस्त्राचा धाक दाखवून हप्ता वसुली करणाऱ्या दोघांना पोलिस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले. या घटनेतील एक संशयित फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये भीक मागणारे काही तृतीयपंथीय रविवारी (ता. २६) इगतपुरी बसस्थानकाजवळील दर्गा परिसरात बसलेले होते. या ठिकाणी तीन युवक कोयता व धारदार शस्त्र घेऊन आले व त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून ठार करण्याच्या धमक्या देत नेहमीप्रमाणे हप्ते वसुली करण्याचा प्रयत्न केला.

विनवणी करूनही हे युवक ऐकायला तयार नव्हते. त्यातच त्यांनी शस्त्राचा धाक दाखवल्याने तृतीयपंथीय भयभीत झाले. याच वेळी गस्त घालणाऱ्या वाहनातील पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांचे त्यांच्याकडे लक्ष जाताच या युवकांनी पळ काढला. पोलिस पथक व पोलिस निरीक्षकांनी त्यांचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतले. तृतीयपंथीयांची विचारपूस केली असता, हा हप्ते वसुलीचा प्रकार समोर आला.

या प्रकरणी सुगंधा परशुराम गायकवाड (वय ३८, रा. पत्रीपूल झोपडपट्टी, कल्याण पूर्व) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित सूरज गोपीचंद भंडारी, गोपीचंद काशीनाथ भंडारी (दोघेही रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक संशयित मात्र फरारी आहे. हप्ता वसुली करणारी टोळी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

पोलिस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे, संदीप शिंदे, पी. एस. खिल्लारी, गोपनीय शाखेचे नीलेश देवराज, हवालदार मुकेश महिरे, सचिन देसले, सचिन मुकणे, अभिजित पोटिंदे, शरद साळवे, राहुल साळवे आदी तपास करत आहेत.

खुनापर्यंत मजल

कल्याण ते इगतपुरी मार्गावर रेल्वेगाड्यांमध्ये तृतीयपंथीय, पाणी बॉटल व खाद्यपदार्थ विक्रेते असे सुमारे ४०० हॉकर्स २४ तास धंदा करतात. या प्रत्येकाकडून दर आठवड्याला ५०० रुपये वसूल केले जातात. लाखो रुपयांत जमा होणारी ही रक्कम प्रत्येक गुंड आपल्या धाक व दराऱ्यानुसार आपसांत वाटून घेतात. याच कारणामुळे त्यांची आपसांत भांडणे होऊन प्रकरण खुनापर्यंत पोचत आहे. त्यामुळे हे गुंड संपविणे ही शहराची गरज बनली आहे.